Private Advt

चाळीसगावातील सासर असलेल्या उच्च शिक्षीत तरुणीची आत्महत्या : पतीला अटक

चाळीसगाव : सासरच्या जाचाला कंटाळून चाळीसगावातील सासर असलेल्या उच्च शिक्षीत तरुणीने अभोणा (ता.कळवण) येथे माहेरी रविवारी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी विवाहितेने इंग्रजीत सुसाईड नोट लिहिली असून त्या आधारे पतीसह सासु-सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर पतीला अटक करण्यात आली. विशाखा शैलेश येवले-वेढणे असे मृत विवाहितेचे नाव आहे.

अवघ्या नऊ महिन्यांपूर्वीच झाला विवाह
13 जुलै 2021 रोजी मृत विशाखाचा कळवणला थाटामाटात विवाह पार पडला. विवाहानंतर मात्र ‘पती शैलेश यास इस्कॉन धार्मिक संस्थेत मोठे होण्यासाठी संन्यास घ्यायचा होता. तुझ्याशी फक्त हळद लावण्यापुरतेच लग्न केले आहे. तुझ्याशी कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवता येणार नाही. तू येथे राहू नको, येथून निघून जा व आम्हाला मोकळे कर’ असे वारंवार बोलून सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
मयत विवाहितेचा भाऊ तन्मय नरेंद्र वेढणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभोणा पोलिसांनी पती शैलेश रमेश येवले, सासरे रमेश महादू येवले, सासू रंजना रमेश येवले (सर्व रा. घाटरोड, ता.चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांची पोलिस कोठडी
गुन्हा दाखल झाल्यानंतर पती शैलेश यास पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर मृत विवाहितेचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एकनाथ भोईर तपास करीत आहेत.