Private Advt

चाळीसगावातील सराफा बांधवाला 50 हजारांचा गंडा

चाळीसगाव : डॉक्टर असल्याचे भासवून चाळीसगावातील सराफा बांधवांना 50 हजारांत गंडवून अज्ञात भामट्याने धूम ठोकली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

हॉस्पीटलमध्ये बोलावत एक तोळ्याची चैन लांबवली
चाळीसगाव शहरातील रथगल्ली येथील मयुर प्रकाशचंद जैन (33) हे सोन्याचे व्यापारी असून त्यांचे रथगल्लीत सराफा दुकान आहे. शुक्रवार, 7 जानेवारी रोजी सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास मयुर प्रकाशचंद जैन यांना 7744045804 या क्रमांकावरून फोन आला. मी शिवशक्ती इस्पितळातून असिस्टंट डॉ.एस.के.जैन बोलत असून माझ्या घरी कार्यक्रम असल्याने मला एक तोळा सोन्याची चैन हवी आहे. चैने घैवून आपण शिवशक्ती इस्पितळात या, आल्यावर पैसे देतो, असे सांगून त्यांनी फोन ठेवला. त्यावर मयुर यांनी दुकानातील कारागीर मंगेश याला सोन्याची चैन घेऊन इस्पितळात जायला सांगितले. मंगेश इस्पितळात दाखल होताच मीच असिस्टंट डॉ.एस.के.जैन असून पैसे कॅबीनमधून घेऊन येतो, असे सांगून त्या भामट्याने धुम ठोकली. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. मयुर प्रकाशचंद जैन यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.