Private Advt

चाळीसगावातील गुटखा प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानात 

भुसावळ/चाळीसगाव : भुसावळात अलिकडे सव्वादोन कोटींचा गुटखा पकडण्यात आल्याची घटना ताजी असताना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कंटेनरचा सिनेस्टाईल पाठलाग करीत तब्बल 82 लाखांचा गुटखा जप्त केला होता. सोमवार, 4 रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आल्यानंतर मंगळवारी कंटेनर चालक सरपू खा इद्रीस खा (40, राजस्थान) यास अटक करण्यात आली होती. आरोपीला बुधवारी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता त्यास 11 पर्यंत अर्थात सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुटखा नेमका कुणाचा व कुठून कुठे नेला जात होता? यासाठी पोलिसांचे पथक आता राजस्थानात जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मालेगाव रोडवरील बेलगंगा कारखान्याजवळ कंटेनर (एच.आर.38 ए.बी.6096) ला पकडल्यानंतर त्यातील 82 लाखांचा गुटखा जप्त केला होता. अटकेतील चालकाने हा गुटखा राजस्थानातून आणल्याची कबुली दिल्याने हा गुटखा नेमका कुणी दिला व त्याची नेमकी कुठे वाहतूक केली जात होती? याबाबतची चौकशी केली जाणार आहे. आरोपी कंटेनर चालक सरपू खा इद्रीस खा यास बुधवारी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता त्यास 11 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहेत.