Private Advt

चाळीसगावातील खासदार, आमदारांसह जमावाविरोधात गुन्हा

छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात नियमांचे उल्लंघणाचा ठपका

भुसावळ/चाळीसगाव : छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह चार ते पाच हजारांच्या जमावांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शहरातील सिग्नल चौकात बुधवारी दुपारी 2 ते 4 वाजेच्या सुमारास करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी एकच गर्दी केली. दरम्यान जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघण केल्याचा ठपका ठेवत खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजेंद्र पाटील, नगरसेवक संजय पाटील, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक शेख चिरागउद्दीन रफिक उद्दोन शेख, नगरसेवक चंद्रकांत तायडे, फकिराबेन मिझा, कैलास पाटील व इतर चार ते पाच हजार लोकांच्या अज्ञात जमावांविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

नियमांचे उल्लंघणाचा ठपका
पोलिस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात कलम- 188 प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) व मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1), (3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहा.निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.