चार लाखांच्या उधारीमुळे आतेभावानेच केला मामेभावाचा खून

धुळे गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा उलगडा : मयत चालक धुळ्यातील रहिवासी : उच्च शिक्षित आरोपीला पोलिसांनी घातल्या बेड्या

भुसावळ/धुळे : अनोळखी इसमाच्या खुनाची उकल करण्यात धुळे गुन्हे शाखेला यश आले आहे. या घटनेतील मयताचा खून एलएलबीचे शिक्षण घेणार्‍या आतेभावानेच केल्याचे उघड झाले आहे. दुधासह हातउसनवार दिलेल्या रकमेची उधारी तब्बल चार लाख होवूनही ती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने ही घटना घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या घटनेत व्यवसायाने चालक असलेल्या गोरक्षनाथ विठ्ठल पाटील (40, मुळ रा.नगाव, ता.धुळे, हल्ली रा.प्लॉट नं.31 ब, साई कॉलनी, अरुणनगर वडेलरोड, देवपूर, धुळे) यांचा खून झाला तर खून प्रकरणी आरोपी गजानन सजन देवरे (पाटील, 42, ज्यैतोबा मंदिराजवळ, भोकर, ता.जि.धुळे) यास अटक करण्यात आली.

मृतदेहाची ओळख पटताच उलगडले गुपित
सोनगीर पोलिस ठाणे हद्यीतील मौजे निकुंभे, ता.जि.धुळे शिवारातील जंगलात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह गुरुवार, 16 डिसेंबर रोजी आढळला होता. सुरूवातीला सोनगीर पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे कर्मचारी विजय जब्बरसिंग पाटील यांच्या खबरीवरुन अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील अनोळखी मयताची ओळख पटविण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेसह सोनगीर पोललिस स्टेशनच्या वतीने सोशल मिडीयाचे माध्यमून तसेच नागरीकांशी प्रत्यक्ष संपर्क करुन, परिसरात मयताचे फोटो व्हायरल करण्यात आले. सोमवार, 20 डिसेंबर सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अनोळखी मयताची ओळख पटली होती. मयत हा गोरक्षनाथ विठ्ठल पाटील (40, मुळ रा.नगाव, ता.धुळे, हल्ली रा.प्लॉट नं.31 ब, साई कॉलनी, अरुणनगर वडेलरोड, देवपूर, धुळे) असल्याचे व तो व्यवसायाने चालक असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते.

पोलिसांचा संशय ठरला खरा
पोलिसांनी मयताची पार्श्वभूमी तपासल्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी मयताचा आतेभाऊ तथा दुध व्यावसायीक गजानन देवरे याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. पोलिसांची खात्री होताच संशयीत गजानन सजन देवरे यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. मयत गोरक्षनाथ पाटील हा संशयीत गजानन देवरे हे एकमेकांचे सख्खे आतेभाऊ मामेभाऊ असून त्यांच्यात नेहमी आर्थिक व्यवहार होत होते. गजानन देवरे यांनी गोरक्षनाथ यांना दिलेल्या दुधापसह हात उसनवारीची रक्कम तब्बल चार लाखांवर जावूनही संबंधित उधारी देत नसल्याने त्यांच्यात खटके उडत होते. बुधवार, 15 डिसेंबर रोजी गोरक्षनाथ पाटील हे चिचगाव डंढाणे, ता.धुळ्याकडे जात असताना जंगलातच गजानन देवरे याने अडवत बेदम मारहाण केली तसेच तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर हल्ला चढवल्याने जागीच गोरक्षनाथ यांचा मृत्यू झाला. ओळख न पटण्यासाठी चेहर्‍यावरही दगडाने हल्ला करण्यात आला. त्यानंतर आरोपीने जंगलातून पळ काढला तर मयताची ओळख पटल्यानंतर झालेल्या अंत्यविधीच्या कार्यक्रमास आरोपीने हजेरी लावली मात्र पोलिसांनी अखेर आरोपीच्या मुसक्या आवळताच त्याने गुन्हा कबुल केला.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा धुळ्याचे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार संजय पाटील, संतोष हिरे, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल पाटील, योगेश चव्हाण, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, योगेश जगताप, किशोर पाटील,सुनील पाटील, मनोज महाजन, चालक हवालदार विलास पाटील व चालक नाईक गुलाब पाटील आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.