चामडी सोलून काढेन! भाजपच्या महिला खासदाराची धमकी

0

लखनऊ । भाजपमध्ये वाचाळवीरांची काहीच कमी नाही. जुने वाचाळवीर अधूनमधून आपल्या वाचाळ वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत येतात. दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. खासदार आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेताच कामाचा धडाका लावला असतानाच भाजपच्या एका महिला खासदाराने मुक्ताफळे उधळली आहेत. बाराबंकी मतदारसंघाच्या खासदार असलेल्या प्रियांका सिंह रावत यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षकाला फोनवरून धमकावताना ‘चामडी सोलून काढेन!’ असे वक्तव्य करत मुक्ताफळे उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या या विधानावर त्या ठाम असून, पत्रकारांनी याबाबत त्यांना विचारले असतानाही त्यांनी तेच शब्द वापरले.

जे काम करतील तेच राहतील
आपल्या विधानावर ठाम राहात खासदार प्रियांका यांनी मागच्या सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, मागच्या सरकारमध्ये त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरकारभार केला. आता तो जमाना गेला. आता सगळे बदलले असून, जर काम व्यवस्थीत केले नाही. लक्षात ठेवा केंद्रात नरेंद्र मोदी, तर राज्यात योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे, तर चामडी सोलून काढू, असे वक्तव्य प्रियांका यांनी केले आहे. जे चांगले काम करतील तेच जिल्ह्यात राहतील. जर त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही, तर आम्ही योग्य कारवाई करू, असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. उत्तर प्रदेशात योगी सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजपाचे पदाधिकारी सरकारी आणि इतर आस्थापनांच्या अधिकार्‍यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. योगी सरकारच्या भीतीमुळे आधिकारीही लोकांची कामे करायला लागले आहे.

भाजपाई अतिउत्साही
ज्या अधिकार्‍याला धमकी दिली त्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, संबंधित अधिकार्‍याने आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही. त्याने गैरवर्तणूक केली म्हणूनच मी त्याला खडसावले. असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान, उत्तर प्रदेशात अशा प्रकारे घडलेली आणि उघडकीस आलेली ही दुसरी घटना आहे. खासदार प्रियांका यांनी अधिकार्‍याला धमकी देण्यापूर्वी बुधवारी आणखी एक असाच प्रकार घडला. भाजप आमदार केसर सिंह यांनी बँक व्यवस्थापकाला त्याच्या कार्यालयातून खेचत बाहेर आणले आणि मारहाण केली.