चाकोरी बाहेरच्या विचारातून सृजनशीलतेचे तंत्र आत्मसात करावे

0

भुसावळ । पारंपरिक विचारांपेक्षा वेगळा सकारात्मक विचार करून जुन्या गोष्टींकडे नव्या दृष्टीकोनातून पाहणे म्हणजे सृजशीलता होय. सृजनशीलतेची जोपासना केल्यास त्याचे कौशल्यात रूपांतर होवून तीच आपली जीवनशैली बनते. यासाठी चाकोरीबाहेरच्या विचारातून सृजनशीलतेचे तंत्र आत्मसात करण्याचे आवाहन भुसावळ येथील द .शि. विद्यालयातील उपशिक्षक डॉ.जगदीश पाटील यांनी येथे केले. के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वर्गवार हस्तलिखित प्रकाशन व स्व. बाबासाहेब के. नारखेडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित आंतरवर्गीय स्पर्धेच्या बक्षीस समारंभाप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शालेय समिती चेअरमन पी.व्ही. पाटील, मुख्याध्यापक ए.सी. वारके, उपमुख्याध्यापक एन.बी. किरंबे, पर्यवेक्षक एन.एन. भारंबे, आर.ई. भोळे यांची उपस्थिती होती. स्वागतगीतानंतर सरस्वती माता व स्व. बाबासाहेब के. नारखेडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

विजेत्यांना रोख पारितोषिक

मुख्याध्यापक ए.सी. वारके यांनी प्रास्ताविकातून स्पर्धांचा आढावा घेतला. कल्पकतेने वर्गवार सजवून साकारालेल्या हस्तलिखितांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आंतरवर्गीय स्पर्धांतील विजेत्यांना रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

शिकण्याची तयारी ठेवा

आपल्या मनोगतात डॉ.जगदीश पाटील म्हणाले की, आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज भासली अथवा कोणती समस्या जाणवली की तेथून पुढील प्रवास सृजनशीलतेकडे होतो. या प्रवासात सातत्य हवे. सहशालेय उपक्रमांतून सृजनशीलतेचा विकास होत असल्याने नवीन गोष्ट शिकण्याची तयारी ठेवण्याचे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात पी.व्ही. पाटील यांनी कष्टातून यशाचा मार्ग सुकर होत असल्याचे सांगितले. परिचय कांचन राणे यांनी करून दिला. सूत्रसंचालन वैशाली महाजन यांनी तर आभार एन.एन. भारंबे यांनी मानले.