चाकु हल्ल्यातील चारही संशयितांना अटक

0

जळगाव । डंपरच्या वादातून झालेल्या चाकु हल्ल्यातील चार संशयितांना शिवाजी नगर येथून एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवारी अटक केली. या चौघांनी 15 जानेवारीच्या रात्री सचिन भानूदास भोळे या तरूणाला शहरातील डिमार्ट जवळ रात्री 11.30 वाजेच्या सुमारास डोक्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर पोलीसांनी सचिन याच्या जबाबावरून चाकु हल्ला करणार्‍या तरूणांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीसांकडून चौकशी सुरू आहे.

अशी घडली होती घटना : शहरातील नेहरु नगरमध्ये सचिन भानुदास भोळे (वय 28) राहतात. त्यांचे मेव्हुणे भुषण महाजन यांचे स्टोन क्रशर शिरसोलीला आहे. याठिकाणी सचिन भोळे यांचा दिनेश देसाई, गिरीष द्राक्षे यांच्याशी वाद झाला. दिनेश देसाई यांनी भुषण महाजन यांच्याशी त्यांच्या डंपरचा व्यवहार केला होता. हा डंपर 2015 रेमंड चौकात झालेल्या अपघातामध्ये जमावाने जाळून टाकला होता. त्यामूळे डंपरचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान भरपाईवरुन भुषण महाजन आणि देसाई यांच्यामध्ये वाद सुरु होता. यातुन 15 जानेवारीला रविवारी शिरसोली येथे स्टोन क्रशरवर सचिन भोळे यांच्याशी दोघांनी वाद घातला. या वादातुन रात्री 11.30 वाजेच्या सुमारास डीमार्ट जवळून दिनेश देसाई याने फोन करुन सचिन भोळे याला बोलावुन घेतले. आणि डंपरच्या व्यवहारामध्ये पडू नको अशी धमकी दिली. दोघांमध्ये हाणामारी झाल्याने यावेळी दिनेश देसाई, गिरीष द्राक्षे याच्यासह अजय जगताप व राहुल जुमेवाळी यांनी भोळे यांना तलवारीने मारुन जखमी केले. एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांना झाली अटक
15 जानेवारीच्या रात्री घटना घडल्यापासून चाकु हल्ला करणारे दिनेश देसाई, गिरीष द्राक्षे, अजय जगताप व राहुल जुमीवाळी हे चौघेही संशयित फरार होते. दरम्यान, एमआयडीसी पोलीसांनी संशयितांचा शोध घेणे सुरू केले होते. पीएसआय रोहन खंडागळे यांना संशयितांविरूध्द माहिती मिळाली. यानंतर रोहन खंडागळे, गुन्हे पथकातील रामकृष्ण पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे यांनी गुरूवारी रात्री शिवाजी नगर गाठून दिनेश देसाई, गिरीष द्राक्षे, अजय जगताप, राहूल जुमीवाळी यांना ताब्यात घेवून अटक केली.