चाकरमान्यांचा वाली कोण?

0

डॉ.युवराज परदेशी:

‘बिगिन अगेन’ मोहिमेअंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर अनेक व्यवहार, कार्यालयीन कामकाज सुरु करण्यात आले. मात्र अजूनही रेल्वे, लोकल बंद असल्याने राज्यासह देशभरातील चाकरमान्यांचे होणारे हाल वाढतच आहेत. अर्थातच यास जळगाव जिल्ह्यातील चाकरमाने अपवाद नाहीत! नोकरी वा व्यवसायासाठी जाणार्‍या सर्वांपुढे प्रवास कसा करायचा आणि ठरलेली वेळ कशी गाठायची हा प्रश्न चिंताजनक बनला आहे. 23 मार्चपासून रेल्वे बंद असल्याने अनेकांना रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. परिणामी रस्त्यांवर वाहनांचा भार वाढू लागला आहे. सध्या चाळीसगाव-पाचोरा-जळगाव-भुसावळ महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे या रस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी नोकरदारांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. काही ठिकाणी रस्ते खंदण्यात आले आहेत. त्याचाही त्रास सहन करावा लागतो. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम या नोकरदारांच्या कामावर होऊ लागला आहे. या मार्गावर एसटीची सेवा देखील सुरु झाली आहे. मात्र त्यांचे वेळापत्रक व सुरक्षिततेच्या दृष्टीने अजूनही त्यास हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्यात आली होती. कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून देशासहीत राज्यातसुद्धा रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. याकाळात सरकारी, खासगी कार्यालयेही बंद होती. परिणामी लाखो रोजगार बुडाले, हातावर पोट असणारे मिळेल तिथे काम शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत झाले आहेत. रोजगार आणि नवनिर्मितीची अशी दुष्काळी परिस्थिती एकीकडे, तर दुसरीकडे कोरोना रोखण्यासाठी आवश्यक असणार्‍या उपाययोजनांसह उपचारातील निष्काळजीपणा कमी अधिक प्रमाणात सर्वत्र सुरु आहे. त्यातच एक महिन्यांपासून काही प्रमाणात करण्यात आलेल्या अनलॉकने अनेक कार्यालये सुरु करण्यात आली. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यापासून परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे. आता सर्व चाकरमानी कामावर रुजू होवू लागले. पण या चाकरमान्यांसाठी कार्यालयापर्यंत पोहोचायचे कसे याचे योग्य नियोजन सरकारने न केल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत हलाकीची होत आहे. रेल्वेसेवेअभावी नोकरदारांचे हाल सुरू आहेत. खासगी कार्यालये नियमित सुरु झाल्याने सर्व चाकरमन्यांची प्रचंड तारांबळ उडत आहे.

रेल्वे बंद असल्याने बहुतांश कर्मचारी आपआपल्या दुचाकी-चारचाकी वाहनांनी कार्यालय गाठत आहेत. जळगाव शहरातील अनेक शासकीय कार्यालयांसह खाजगी कार्यालयांमध्ये चाळीसगाव, हिरापूर, गाळण, भडगाव, पाचोरा, म्हसावद, शिरसोली, पारोळा, अमळनेर, धरणगाव, भुसावळ आदी गावांमधील शेकडो कर्मचारी काम करतात. या कर्मचार्‍यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडत कार्यालय गाठावे लागते. यासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारने चाकरमान्यांची गाडी रुळावर येण्यासाठी लोकल रुळावर आणण्याचा विचार तातडीने करणे आवश्यक आहे. करण्याची परवानगी आहे. लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने अनेक कार्यालयं सुरु झाली असून कर्मचार्‍यांना बसने प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनाही लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी होत आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप मुंबईत लोकल रेल्वे वाहतूक सुरु करण्यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान मध्य रेल्वेने राज्य सरकारने परवानगी दिल्यास रेल्वे सुरु करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

कोरोनाकाळात शारीरिक अंतराचे नियम अबाधित ठेवून प्रवाशांचा उपनगरीय रेल्वेप्रवास सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मात्र, लोकल रेल्वेसाठी होणारी प्रवाशांची गर्दी पाहता, मुंबईतील कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण होणार आहे. याबाबत रेल्वेने पुढाकार घेतला असून लवकरच या मुद्यावर राज्य सरकार, महापालिका यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रेल्वे स्थानकात मोजकेच प्रवेशद्वार आणि प्रवेशावर नियंत्रण, स्थानकात आणि लोकल गाडीत शारीरिक अंतर राखण्याचा प्रयत्न, कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी प्रयत्न, बदललेल्या कार्यालयीन वेळांनुसार लोकलचे वेळापत्रक, अशा अनेक शक्यतांवर रेल्वेप्रशासन काम करत आहे. मात्र चाकरमान्यांची ही अडचण केवळ मुंबईपुरता नसून सर्वदूर आहे. याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. रेल्वे 12 सप्टेंबरपासून 80 विशेष ट्रेन सुरु करणार आहे. या सर्व ट्रेन्स राखीव असतील. यामुळे ट्रेनमधून फक्त कन्फर्म तिकिट असलेल्यांनाच प्रवास करता येणार आहे. यामुळे या ट्रेन्सचा चाकरमान्यांना कितपत फायदा होईल, हे सांगणे थोडे कठीणच आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या यादीत इंटरसिटी गाड्यांकडे कानाडोळा करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातूनही केवळ मुंबई-मनमाड, परभणी- हैद्राबाद आणि सोलापुर-म्हैसुर या तीनच गाडयांना हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे प्रवाशांची निराशा झाली आहे. नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी व्यावसायिक तसेच नोकरदारांची संख्या मोठी आहे. यासह मनमाडहून भुसावळकडे जाणार्‍या चाकरमान्यांचीही संख्या मोठी आहे.

पंचवटी एक्सप्रेस सुरु होणार असल्याने आता नाशिकच्या चाकरमान्यांची अडचण सुटली असली तरी चाळीसगाव-पाचोरा-जळगाव-भुसावळ दरम्यान प्रवास करण्यांना अद्यापही कोणताच दिलासा मिळालेला नाही. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी चर्चा करुन तोडगा काढणे आवश्यक आहे. जसे मुंबईला लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नोकरदारांना ओळखपत्र व कंपनीचे संमतीपत्रक असल्याशिवाय पास देवू नये, जितके सीट्स आहेत तितक्याचा पासेस दिल्यास चाकरमान्यांची सोय होवू शकते. राज्यात आता आंतरजिल्हा प्रवासावरील बंदीही उठविली आहे. रेल्वेतूनही आंतरजिल्हा तिकीट उपलब्ध होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच चालणार्‍या रेल्वे सुरू करण्याची मागणी पूर्णपणे अव्यवहार्य नाही. प्रवास करताना योग्य ती खबरदारी घेतल्यास एसटीप्रमाणे रेल्वेचा प्रवास देखील सुरक्षित होवू शकतो.