चांदणी चौक उड्डाणपुलासाठी 89 टक्के भूसंपादन

0

आयुक्त सौरभ राव यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास पत्र

पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणार्‍या उड्डाणपुलासाठी 89 टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. हे भूसंपादन पूर्ण झाल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रमाणित केले असून त्याबाबतचे पत्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास पाठविण्यात आले आहे.

शहराचे पश्‍चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल उभारला जाणार आहे. याचे भूमिपूजन मागील वर्षी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर वर्षभरात भूसंपादन न झाल्याने हे काम रखडले होते. या पुलासाठी महापालिकेस सुमारे 13.99 हेक्टरचे भूसंपादन करावे लागणार होते. त्यासाठी पालिकेकडे निधी नसल्याने राज्यशासनाने महापालिकेस विशेष बाब म्हणून सुमारे 185 कोटींचे अनुदान मंजूर केले. तर, हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडून करण्यात येणार असल्याने त्यांनी या कामासाठी 80 टक्के भूसंपादनाची अट घातली होती.

28.32 हेक्टर जागा ताब्यात

चांदणी चौकात उड्डाणपुलासाठी 31.76 हेक्टर जागा लागणार होती. त्यातील सुमारे 13.2 हेक्टर जागा एनएचआयच्या ताब्यात आहे. ती महामार्गासाठीची आहे. तर उर्वरीत 18.56 हेक्टरच्या भूसंपादनाची जबाबदारी महापालिकेची होती. यात 4.57 टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात होती. तर उर्वरित 13.99 हेक्टर खासगी जागा होती. त्याचे भूसंपादन सुरू होते. या 13.99 हेक्टरमधील 10.55 हेक्टर खासगी जागेचे भूसंपादन झाले असून उर्वरित 3.44 टक्के जागेचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आयुक्तांनी प्रमाणित केलेल्या भूसंपादनानुसार आजअखेर 28.32 हेक्टर जागा (89 टक्के) महापालिकेच्या ताब्यात आली असून तिचे हस्तांतरण एनएचएआयकडे करण्यात आले आहे.

Copy