चला रं पोपटीला…

0

रायगड जिल्हा म्हटला की आपले छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमी संस्कृती आठवते. मात्र, या जिल्ह्याची स्वतःची आपली वेगळी खाद्य संस्कृती. या जिल्ह्यातील खास आगरी संस्कृती, तेथील बोलीभाषा आणि खाद्यान्न हेसुद्धा वेगळेपण आहे. मच्छी, चिकन, मटण सोबत तांदळाच्या पिठाची चुलीवर त्यातही खापरीवरील भाकरी ही चव काही खासच. घरगुती जेवण म्हणून आजही अनेक पर्यटक अशा चविष्ट अन्नाला जवळ करतात. आगरी समाज यात आघाडीवर आहे.

आताही नवी मुंबईनजीकच्या उरण, पनवेल, पेण, अलिबाग भागात वरील पद्धतीचे मांसाहारी जेवण करण्यासाठी, त्याची खास चव घेण्यासाठी अनेक पर्यटक ये-जा करीत असतात. तसेच अनेक कुटुंबेही आपल्याकडे आलेल्या नातेवाईक नि मित्रांना अशा खास मांसाहारी जेवणाची झणझणीत चव घ्यायला लावतोच. अर्थात या गोष्टी अनेक वर्षांपासून सुरू असल्या, तरी गेल्या काही वर्षांत याच रायगड जिल्ह्यातील आणि विशेषत: वरील तालुक्यातील ग्रामीण भागात वालाच्या शेंगांची पोपटी हा विषय खाण्याइतकाच चर्चेतही जोरकस आहे. पावसाळा संपला, भातशेती मोकळी झाली की, अनेक शेतकरी वाल, पावटे, चवळी अशा पिकांसाठी पेरणी करतात. हिवाळ्यातील वातावरणात ही पिकेही चांगली फुलतात. साधारणत: दोन महिन्यांतच रोपट्यांना शेंगा येऊ लागतात. पुढे हे पीक एक-दीड महिने सुरू राहते.

हीच संधी साधत वालाच्या शेंगांची पोपटी तयार करण्याची टूम कुणाच्या डोक्यात आली असावी नि पुढे म्हणजे अलीकडच्या 10-12 वर्षांत तिची सर्वत्र री ओढली गेली. त्यामुळे पोपटीच्या शेंगा खाण्याचा आनंद घेण्यासाठी शेकडो नव्हे, तर हजारो लोक यात तरुणाईप्रमाणे ज्येष्ठही अग्रणी आणि अग्रभागी असतात. गाववाले तर पोपटीसाठी आतुरलेले असतातच त्याचबरोबर आपल्या नातेवाईक, मित्रांनाही या पोपटीचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करीत असतात. त्यातच या पोपटी पद्धतीने शाकाहारीवरून मांसाहारीतही प्रवेश केल्याने खाण्यातील मौज तरी शब्दात काय वर्णावी? आताही पनवेल, उरण तालुक्यातील ग्रामीण भागात रात्री नि प्रसंगी दिवसाही पोपटीच्या शेंगांवर ताव मारणारी मंडळी अनेक जागी दिसून येतात. तसे पाहता पोपटी हा शब्दप्रयोग आणि ती प्रक्रिया कोणी नि कधी सुरू केली? हा औत्सुक्याचा विषय असला, तरी या प्रकियेतून बाहेर आलेल्या शेंगांच्या चवीपुढे कालबाह्य ठरते. पोपटीच्या शेंगा खाताना चव काही न्यारीच. मात्र, या शेंगा ना शिजवल्या जात, ना उकडल्या जात, ना भाजल्या जात ना होरपळण्याची प्रक्रिया होत, तरीही मडक्यातील शेंगा बाहेरील आगीच्या धगीने मडक्यातील वाफेवर शिजल्या जातात. शिजण्याची प्रक्रिया वा पद्धती काही वेगळीच वाटते. मात्र, याच पद्धतीने तावून-सुलाखून निघालेल्या शेंगांची चवच लय भारी. हे शब्द आपसूक तोंडातून बाहेर आल्याखेरीज राहत नाही. आता वालाच्या शेंगांबरोबरच पावट्याच्या शेंगाही वापरतात. पण खास चव मात्र वालाच्या शेंगांनाच.

नवी मुंबई नजीकच्याच पनवेल, उरण, पेण, कर्जत या तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजू शेतकरी वाल, पावटे, चवळीच्या उत्पादनातून घरखर्च भागवण्याचा प्रयत्न करीत असतोच. वालाच्या शेंगा सुकल्यानंतर सुका वाल भाजीसाठी अनेकजण खरेदी करतात, त्यासाठी शेतकर्‍याला शेंगा सोलण्याची मेहनत करावी लागते नि वाल संपेपर्यंत पैसे मिळण्यासाठी संयम बाळगावा लागतो. मात्र, पोपटीसाठी वालाच्या शेंंगांची मागणी वाढल्याने त्यांच्या धंद्यातही चांगलीच बरकत आहे. अगदी किमान 100 रुपये किलो, आदोळी अशा वाढीव दराने खरेदी कराव्या लागतात, तर मडक्यांनाही चांगलीच मागणी वाढली आहे. मडक्याची किंमतही 100 रुपयांच्या घरात आहे. शिवाय चिकन नि मग काहींना होणारा ओली पार्टीचा मोह या सार्‍यात चांगलाच पैसा खर्च होतो. मात्र, हौसेला मोल नाही हेही खरेच.

– रामनाथ चौलकर