चकमकीनंतर चार दहशतवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर । द हा तासांच्या तुफान चकमकीनंतर चार दहतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला. श्रीनगरपासून 60 किलोमीटरवर असलेल्या दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा येथे एका घरामध्ये हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाचे सात दहशतवादी एकत्र आल्याची माहीती लष्कराला मिळाल्यानंतर या दहशतवाद्यांना घेरण्यात आले.

घराला वेढून ‘एन्काऊंटर’!
लष्करातील उच्च पदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाचे सात दहशतवादी एका घरामध्ये एकत्र आले होते. सुरक्षा यंत्रणांना ही माहीती मिळताच मध्यरात्री या घराला वेढण्यात आले. या एन्काउन्टरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर तिघेजण जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यापैकी एकजण जखमी झाला आहे. लष्कर, स्थानिक पोलिस आणि अर्ध लष्करी दलाच्या पथकांनी तब्बल दहा तास चाललेले हे ऑपरेशन यशस्वी केले. एन्काउन्टर संपल्यानंतर घटनास्थळी मोठ्याप्रमाणात जमाव जमल्याने पोलिसांना बळाचा वापर करून जमाव पांगवावा लागला.

पाकविरूध्द पुरावे
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगीतले की, ही दहशतवादी कृत्ये पाकिस्तानची असल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे असून आपण ते चांगल्या प्रकारे उघड करू शकतो. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात काश्मीर खोर्‍यात बर्फवृष्टी होत असल्याने पाकिस्तानातून सीमारेषा पार करून काश्मीर खोर्‍यात येणे अवघड असते. मात्र, तरीही दहशतवादी कृत्ये सुरूच असतात.