चंद्रकांत पाटील आणि दिवाकर रावते यांच्यावर दुष्काळी परिस्थितींचा आढावा घेण्याची जबाबदारी

0

मुंबई – राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दोन मंत्र्यांच्या नेतृत्वात दुष्काळी भागातील पालकमंत्री संबंधित तालुक्यांचा दौरा करतील. या दौऱ्यात दुष्काळी भागांची पाहणी करुन संबंधित अहवाल सादर करतील, त्यांनंतर आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांन दिलासा मिळणार आहे.

राज्यातील अनेक भागात दुष्काळसदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी आणि विरोधकांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर महिनाअखेपर्यंत दुष्काळ जाहीर करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी तालुक्यांचा दौरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री या दुष्काळी तालुक्यांना भेट देतील. त्यानंतर या भागातील पाहणीचा अहवाल तयार करून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि दिवाकर रावते यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागात यंदा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला असल्याने केंद्र शासनाने जाहीर केलेल्या निकषांनुसार राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. या संदर्भात आढावा घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळ घोषित केला जाईल. केंद्रीय समितीने पाहणी केल्यानंतर याचा निर्णय होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

Copy