चंदू चव्हाण सुखरुप मायदेशी

0

नवी दिल्ली । पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान चंदू चव्हाण शनिवारी सुखरूपपणे मायदेशी परतला. जवान चंदू चव्हाणची सुटका हा समस्त देशवासियांसाठी सुखद धक्का असून, केंद्र सरकारच्या मुत्सद्देगिरीचे मोठे यश असल्याचे मानले जाते. चंदू जवान याच्या सुटकेची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबिय व आप्तांनी आनंद व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या त्याच्या गावी ग्रामस्थांनी जल्लोष केला. तर जळगावातील त्यांच्या काकू लताबाई चव्हाण यांनी साखर वाटून त्यांच्या सुटकेचे स्वागत केले. तर बंधू भूषण चव्हाण यांनी सरकार व विशेष करून संरक्षण राज्यमंत्री ना. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. चंदू चव्हाण 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा बजावत होता. 30 सप्टेंबरला पूँच विभागात गस्त घालत असताना चंदू चव्हाणने नजरचुकीने सीमा ओलांडल्याने पाकिस्तानी सैन्याने त्याला ताब्यात घेतले होते. लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर लगेचच ही घटना घडल्याने देशवासियांना धस्स झाले होते. 30 सप्टेंबरपासून तो पाकिस्तानच्या ताब्यात होता.

परत पाठविल्याचे पहिलेच उदाहरण
जवान चंदू चव्हाणला पकडण्यात आले असून, त्याला इस्लामाबादला ठेवण्यात आल्याचे पाक सैन्याकडून सांगण्यात आल्यानंतर चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने तातडीने प्रयत्न सुरू केले होते. चंदू चव्हाणला सुखरूप मायदेशी आणले जाईल, असेही केंद्र सरकारने वेळोवेळी स्पष्ट केले होते. चंदू चव्हाण याच्या सुटकेसाठी डीजीएमओ स्तरावर ंचर्चा सुरू होती. भारताच्या डीजीएमओंनी पाकिस्तानच्या डीजीएमओंसोबत 15 ते 20 वेळा संवाद साधला होता. चंदू चव्हाण सुरक्षित असून, लवकरच त्यांची सुटका केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार शनिवारी चंदू चव्हाणची पाकिस्तानने सुटका केली. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास चंदू चव्हाणला वाघा सीमेवर आणण्यात येवून तेथे भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आले. मायदेशी परतल्याबद्दल चंदू चव्हाणने आनंद व्यक्त केला. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे लष्कराच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. भारतीय जवानाला पाकिस्तानने सुखरूप परत पाठवल्याचे हे पहिलेच उदाहरण ठरले असून, लष्करासाठी हा सुदिन ठरला आहे.

धक्क्याने आजीचा झाला मृत्यू
चंदू चव्हाण हे 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांचा मोठा भाऊ भूषणदेखील मिलिट्रीमध्ये आहे. ते सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहेत. चंदू चव्हाण लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरुन आई-वडिलांचं छत्र हरवलं. त्यामुळे चंदू आणि त्याचा भाऊ भूषण यांचं पालनपोषण बोरविहीर (ता.धुळे) येथील आजी-आजोबांनी केलं. आजी-आजोबा भूषण चव्हाण यांच्यासोबत गुजरातमधील जामनगर इथे राहतात. तर चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचं वृत्त आल्यानंतर आजीचं धक्क्याने निधन झालं. यामुळे मोठा भाऊ भूषण याने चंदू आल्यानंतरच आजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येईल असा संकल्प केला आहे. आता चंदू चव्हाण हे सुखरूपपणे परतल्यामुळे हा संकल्प सिध्दीस जाणार आहे.

सीमारेषा चुकीने केली होती पार
29 सप्टेंबरला भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त करून तब्बल 38 अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. या घटनेनंतर काही काळातच चंदू चव्हाण यांच्या कडून चुकून पूंछ येथील नियंत्रण रेषा ओलांडली गेली आणि पाकिसात्न्च्या हद्दीत पोहचले. त्यानंतर पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आम्ही भारतीय जवानाला ताब्यात घेतल्याचे सांगितले होते. पण काही दिवसातच पाकिस्तानने घुमजाव केला. आणि चंदू चव्हाण आमच्या ताब्यात नसल्याचे म्हटत घुमजाव केल्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला होता. लष्करी जवान चुकून दुसर्‍या देशाच्या हद्दीत गेल्यास ‘स्ट्रॅटेजिक सोल्जर एक्स्चेंज’अंतर्गत लष्कर कारवाई करत असते. तथापी पाकिस्तानने घुमजाव केल्याने चंदू चव्हाण यांच्या सुटकेबद्दल शंका निर्माण झाली होती. नंतर मात्र चव्हाण यांना इस्लामाबादमध्ये ठेवण्यात आल्याचे पाकिस्तानचे लष्करी कारवाई प्रमुख (डीजीएमओ) यांनी सांगितले होते.

आम्हाला विश्‍वास होता की, चंदूला सोडविण्यासाठी तो परत येणार.ज्यांनी ज्यांनी पुढकार घेतला,मदत केली त्याचे सर्वांचे आभार.आमचा चंदू खुप हुशार आहे.
– लताबाई चव्हाण, जवान
चंदू चव्हाण यांच्या काकू

एम. ओ.सुभाष भामरे साहेब यांचा जिवनभर आभारी राहिल.त्यांना धन्यवाद म्हणणार नाही.याचबरोबर भारत सरकार,भारतीय सैन्य,ज्यांनी चंदूला सोडविण्यासाठी प्रयत्न केले,त्या सर्वांचे आभार .मी माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत देशाची सेवा करेल.
– भूषण चव्हाण,
जवान चंदू चव्हाण यांचे भाऊ

आज आमच्यासाठी दिवाळी, दसरा आहे. ज्यांनी चंदूसाठी परत आणण्यासाठी मदत केली त्यांचे सर्वांचे आभार खास करून भारत सरकारचे. डोळ्यात तेल टाकून चंदूची वाट पाहत आहे.तो कधी घरी येणार याच्याकडे डोळे लागले आहे.
– रूपाली पाटील, जवान
चंदू चव्हाण यांच्या बहिण