घोषणांच्या व्याजातच माफी बुडाली

0

मुंबई ।शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रणकंदन होत असताना आतापर्यंत चुप्पी साधलेल्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी मौन सोडले. कर्जमाफी दिल्यानंतर आत्महत्या होणार नाहीत याची हमी द्याल का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही कर्जमाफीच्या विरोधात नाही, मात्र निवडणुकीत पराभूत झाल्याने विरोधक शेतकर्‍यांवरुन राजकारण करत आहेत, त्यांना बँक घोटाळे लपवायचे आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाही विरोधकांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीतच मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.

बँकांचे घोटाळे लपवण्याची छुपी चाल
कर्जमाफीनंतर पाच वर्षात 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे कर्जमाफी करुन आत्महत्या होणार नाहीत, याची हमी विरोधक देणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. आम्हाला कर्जमाफी बँकांची नाही तर शेतकर्‍यांची करायची आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधक कर्जमाफीचे राजकारण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. कर्जमाफीबाबत आम्ही केंद्रसरकारशी चर्चा करु, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विरोधकांना शेतकर्‍यांशी काहीही देणे-घेणें नाही, यांना केवळ राजकारण करायचे आहे, असा हल्ला मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी सांगत स्पष्ट केले की, शेतकर्‍यांनी 1 लाख 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. कर्जमाफीसाठी 30 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. मात्र पूर्ण रक्कम कर्जमाफीसाठी वापरली तरी विकासकामासाठी पैसे पुरणार नाहीत असे फडणवीस म्हणाले. विरोधक हे मगरीचे अश्रू ढाळत आहेत हे राज्यातील शेतकर्‍याच्यादेखील लक्षात येत आहे. निवडणुकांमधील पराभवाने विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.