घर कुडाचे मात्र आदिवासी महिलेने दागिने गहाण ठेवून बनविले शौचालय

0

नवापूर (प्रेमेंद्र पाटील) । कुडाच्या कच्च्या घरात राहत असताना सुध्दा शौचालय असावे ही भावना मनात येऊन एका आदिवासी महिलेने स्वताचे दागिने विकून शौचालय उभारले. या आदर्श निर्णयाचे नवापूर परिसरात कौतुक होत असून सदर महिलेच्या या उपक्रमाने प्रेरणा घेण्याची गरज आहे. लताबाई किमा गावीत रा.जामनपाडा (खानापूर) ता.नवापूर असे त्या महिलेचे नाव आहे. यांनी स्वतःचे सर्व दागिने गहाण ठेवून 30, 000 रूपये किमतीचे पक्के शौचालय आणि बाथरूम बांधून संपूर्ण तालुक्यात स्वच्छतेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.

स्वच्छतेचे महत्व देणारा सकारात्मक संदेश
गाव पातळीवर व शहरातील विविध भागात स्वच्छतेचा संदेश देत प्रचार व प्रसार करून शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सेवाभावी संस्था यात सहभागी होऊन कार्य सुरू आहे. रस्त्यावर शौचाला बसणे अपमानास्पद वाटत असल्याने लताबाई यांनी हा निर्णय घेतला. पैसे नसल्याने त्यांनी हा धाडसी निर्णय घेत शौचालय बनविले. लताबाई गावीत या आदिवासी महिलेला स्वच्छतेचे महत्व पटवून देत सकारात्मक संदेश सर्वांना दिला आहे. नवापूर तालुक्यातील गावपाड्यावर या आदिवासी महिलेच्या या कार्याची माहिती मिळताच महिलेच्या घरी जाऊन नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, कृषी विस्तार अधिकारी विश्वास बनसोडे, सरपंच सुनिल गावीत, ग्रामविकास खोब्रागडे यांनी भेट देऊन लताबाई गावीत या महिलेचे अभिनंदन करून सत्कार केला.

उपक्रमाचे परिसरात कौतुक
लताबाई गावित यांचे घर कुडाचे. मात्र घरात शौचालय नव्हते त्यामुळे घरातील महिला वर्गाला अनेक समस्यांना समोर जावे लागायचे. हे शौचालय बांधण्यासाठीही पैसे अपूरे पडत असल्याने अखेर लताबाई यांनी आपल्या जवळ असलेले सगळे दागिने गहाण ठेवले आहेत. त्यातून आलेल्या पैशातून घरात शौचालय बांधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानामुळे आपल्याला ही प्रेरणा मिळाल्याचे तिने सांगितले. दागिन्यांपेक्षा शौचालयाची गरज कुटुंबाला अधिक होती म्हणूच मी ते विकल्याचे लताबाई यांनी सांगितले. लताबाई यांच्या या उपक्रमाचे परिसरात खूपच कौतुक होत आहे.

पुढारी दखल घेतील काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या स्वच्छ भारत मोहिमेतून प्रेरित होऊन येथील भारतात पहिल्यांदा लता देवी दिवाकर या महिलेने आपल्या निवासस्थानी शौचालय उभारण्यासाठी स्वत:चे मंगळसूत्र विकल्याची घटना समोर आली होती. इथेही लताबाई गावित यांनी हे पाऊल उचलल्याने विलक्षण योगायोग मानला जात आहे. अलीकडेच वाशीम जिल्ह्यातील आव्हाळे नावाच्या महिलेने घरच्यांचा विरोध पत्करून स्वत:चे मंगळसूत्र विकून शौचालय बांधले होते. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळसूत्र देवून केले. लताबाई गावित यांनी देखील असेच पाउल उचलले आहे. विशेष म्हणजे आदिवासी भागातून आलेल्या महिलेने असा निर्णय घेतल्याने लोकप्रतिनिधी दखल घेतील काय? याकडे सर्वांचे लक्ष आहे.