घरातली ‘दंगल’

0

नोटाबंदीवरून भाजप आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या सर्व गदारोळात अरुणाचल प्रदेश, तामीळनाडू आणि उत्तर प्रदेशातील काही घडामोडी लक्ष वेधून घेणार्‍या आणि अन्य घटनांपेक्षा वेगळ्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये गृहकलहाचे नवीन अध्याय समोर येत असून, याचा देशाच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील राजकीय संघर्ष हा दोन पक्षांमध्ये असला, तरी या तिन्ही राज्यांमधील ‘दंगल’ ही अंतर्गत धुम्मस आहे.

च तुरत्र अभिनेता म्हणून ख्यात असणार्‍या आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट लोकप्रियतेचे नवनवीन शिखर सर करत असताना देशातील काही राज्यांमधले राजकारणही चांगलेच तापले आहे. यात अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामीळनाडूत अनुक्रमे ‘पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल’, समाजवादी पक्ष आणि अखिल भारतीय अण्णाद्रमुक या पक्षांमधील अंतर्गत गृहकलह नव्याने उफाळून आला आहे. अरुणाचल प्रदेशचा विचार करता 2016 हे वर्ष स्थानिक राजकारणात अनेक उलथापालथींचे सिद्ध झाले आहे. या राज्यात काँग्रेसचे सरकार असले तरी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नाट्यमय घटना घडल्या आहेत. येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत असले, तरी अंतर्गत वाद उफाळून आले. परिणामी, येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. न्यायालयीन लढाईत विजय झाल्याने काँग्रेसने पुन्हा सत्ता स्थापन केली तरी मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी आपल्या बहुतांश सहकार्‍यांसह आकस्मिकपणे ‘पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल’मध्ये प्रवेश करून पुन्हा मुख्यमंत्रीपद पटकावले. यात घडामोडीत भाजपने खांडू यांना रसद पुरवली. यामुळे येथे स्थिरस्थावर होणार असल्याची अपेक्षा असतानाच खांडू यांच्याबाबत ‘पीपल्स पार्टी’त असंतोषाचे सूर उमटू लागले. खांडू यांचा एककल्ली कारभार आणि विशेष करून भाजपचा राज्याच्या राजकारणातील हस्तक्षेप यामुळे नाराजीचे सूर उमटू लागले. यातच आता पक्षाने चक्क मुख्यमंत्री पेमा खांडू आणि त्यांच्या सहा सहकारी आमदारांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येथे राजकीय संकट निर्माण झाले आहे. हे सारे होत असतांना तामीळनाडूतही अंतर्गत कलहाने नवीन वळण घेतले आहे.

मुख्यमंत्री जयललिता यांच्या अंतिम दिवसांमध्ये शशिकला यांचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित झाले होते. अपेक्षेनुसार त्यांनी आधीच पक्षावर मजबूत पकड घेतली होती. यानंतर त्यांना अधिकृतपणे अण्णाद्रमुकचे महासचिव म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, या निवडीतला फार्स कुणापासून लपून राहिलेला नाही. शशिकला यांच्या निवडीसाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यात आल्याचे नाटक करण्यात आले तरी यातील अनेक बाबी संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार असणार्‍या शशिकला पुष्पा यांना महासचिव पदासाठी अर्जही भरू न देता त्यांच्या समर्थकांना मारहाण करण्यात आली. यातच चेन्नई उच्च न्यायालयाने जयललिता यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून त्यांचा मृतदेह उकरून का काढू नये? असा प्रश्‍न केल्यामुळे अण्णाद्रमुकच्या पाठीराख्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. जयललिता यांच्या मृत्यूबाबत सत्य बाहेर यावे, अशी मागणी आधीदेखील काही जणांनी जाहीरपणे केली होती. यावर न्यायालयानेही अनुकूल भूमिका घेतल्यामुळे अण्णाद्रमुकमधील अंतर्गत संघर्षातील काही कंगोरे येत्या काही दिवसांत समोर येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार्‍या उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असताना सध्या सत्तारूढ असणार्‍या समाजवादी पक्षातील गृहकलह आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. मुख्यमंत्री अखिलेश आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील टोकदार संघर्षाची अनेक प्रकरणे अलीकडच्या कालखंडात घडली. अगदी जाहीरपणे एकमेकांवर तोंडसुख घेण्यापासून ते धक्काबुक्कीपर्यंतचे प्रकार दस्तुरखुद्द ‘नेताजी’ मुलायमसिंग यादव यांच्यासमोर घडले. मध्यंतरी अखिलेश हे वडिलांपासून विलग होत फक्त नवीन निवासस्थानीच राहायला गेले नाहीत तर त्यांनी वेगळी पाऊलवाट चोखाळण्याचीही पूर्वतयारी केल्याने अनेकदा अधोरेखित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘बंड करतो तोच आयुष्यात पुढे जातो’ असे जाहीर उद्गार काढून आपले इरादे जाहीर केले होते. या वादाला आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी यादीवरून नव्याने फोडणी मिळाली आहे. 403 विधानसभेच्या जागा असणार्‍या विधानसभेसाठी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी आधी 325 आणि नंतर 68 नावांचा समावेश असणार्‍या दोन याद्या जाहीर केल्या असून यात अखिलेश यांच्या अनेक समर्थकांचे पत्ते कापण्यात आले आहेत, तर दुसरीकडे अखिलेश यादव यांनीही 235 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात त्यांच्या बहुतांश समर्थकांना स्थान देण्यात आले आहे. यातच शुक्रवारी सायंकाळी अखिलेश आणि रामगोपाल यादव यांना पक्षातून निलंबीत करण्यात आल्याने समाजवादीतली फूट अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत लागलीच निर्णय होण्याचे संकेतही मिळाले आहेत. अरुणाचल प्रदेश, तामीळनाडू आणि उत्तर प्रदेशातील गृहकलह येत्या काही दिवसांमध्ये किती चिघळतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून असून याचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष करून उत्तर प्रदेशात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. समाजवादी पक्षातील ‘महाभारत’ पाहता अखिलेश व रामपाल यादव ही जोडगोळी स्वतंत्र वाट चोखाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी समाजवादीतल्या एखाद्या गटाशी काँग्रेस आघाडी करू शकते. यात भाजपनेही लाभाचे गणित मांडले आहे. तामीळनाडूत नजीकच्या काळात निवडणूक नसली तरी अण्णाद्रमुकमधील फुटीवर भाजपसह सर्वच पक्षांचे लक्ष आहे, तर अरूणाचलमध्ये पेमा खांडू यांचे भवितव्यही अधांतरी आहे. एकंदरीत पाहता या तिन्ही राज्यांमधील गृहकलहावर देशभरातल्या राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार आहे.