घरकूलच्या आरोपींना कोर्टाचा दणका

0

जळगाव : घरकूल प्रकरणी जळगाव महानगरपालिकेच्या आजी-माजी 53 नगरसेवकांकडून प्रत्येकी 1 करोड 16 लाख रुपयांची वसूली करण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर औरंगाबाद हायकोर्टाने आज नगरसेवकांकडून सदर रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. 2013 च्या मनपा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मनपा आयुक्तांनी सर्वांना सदर रक्कम भरण्यासंबंधी नोटीस पाठविली होती. घरकुल घोटाळ्याच्या वेळी विशेष महालेखापरीक्षणच्या स्पेशल ऑडीटच्या संबंधित रक्कम या प्रकरणाशी संबंधित नगरसेवकांना देय असल्याचे सांगितले होते. मात्र आजी-माजी नगरसेवकांनी वेळ भेटला नसल्याचे कारण सांगत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मनपा प्रशासन आणि नगरसेवक आपसी मिलीभगत करून वसूली टाळत असल्याचे निदर्शनास आल्यावर माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी नगरसेवकांकडून संबंधित रक्कम वसूली करण्यासाठी हायकोर्टात गिरीश नागोरी यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. यावर गुरुवारी सुनावणी होऊन संबधित 53 नगरसेवकांकडून प्रत्येकी 1 करोड 16 लाख रूपए वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

राजकीय वर्तुळात खळबळ

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी जळगावातील अनेक महत्वाच्या प्रश्‍नांवर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. राज्यभरात गाजलेल्या घरकूल घोटाळ्यात त्यांनी संबंधीतांकडून वसुली करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. या संदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर न्यायालयाने दिलेला निर्णय हा घरकूलच्या संशयितांना धडकी भरवणारा आहे. या प्रकरणी आधीच अनेक मातब्बरांसह अनेकांनी तुरूंगवास भोगला असून या प्रकरणाचा निकाल लागण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्‍वभूमिवर हा निकाल राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारा ठरणार आहे.

आता पुढे काय?

दीपक गुप्ता यांच्या याचिकेवर निकाल देतांना न्यायालयाने संबंधीत प्रत्येक नगरसेवकांने 1.16 कोटी रूपये भरावे असे निर्देश दिले होते. यावर नगरसेवकांनी ‘आम्हाला पुरेसा वेळ मिळाला नाही’ हे कारण देत यावर स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला होता. यावर उच्च न्यायालयाने स्थगितीस नकार दिला. यामुळे आता महापालिका प्रशासनाने संबंधीतांकडून वसुली करणे अपेक्षित आहे. अर्थात आता चेंडू महापालिका प्रशासन व पर्यायाने आयुक्तांच्या कोर्टात आहे. ते या प्रकरणी काय भूमिका घेतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या संदर्भात दीपक गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी आयुक्तांनी संबंधीतांकडून रक्कम वसूल करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. आयुक्तांनी या संदर्भात टाळाटाळ केल्यास आम्ही उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून कोर्टात याचिका दाखल करू असे सांगितले. दरम्यान, या खटल्यातील संशयितांना निकाल आल्यापासूनच यातून काय मार्ग निघू शकतो? याची चाचपणी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.