घरकुलाची रक्कम न मिळाल्याने गटविकास अधिकार्‍यांना घेराव

0

जळगाव । शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या इंदिरा आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले असून, अनेकांना अनुदानातील दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेला नाही. अनुदानाची रक्कम ऑनलाईन जमा झाली असून, प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना ती मिळालेलीच नाही. तरी तांत्रिक कारणे न सांगता लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळवून देण्याची मागणी होत असून, पंचायत समिती सदस्य व लाभार्थ्यांनी मंगळवारी 2 रोजी बीडीओंना घेराव घातला. जळगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या गावांमधील घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. याकरीता 25 एप्रिलला झालेल्या मासिक सभेत सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. लाभापासून वंचित लाभार्थ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. परंतू, सदर बैठक रद्द करण्यात आल्याने भादली, आव्हाणे, नांद्रा, फुपनगरी, फुपणी, धामणगाव, शिरसोली येथील घरकुलातील लाभार्थींसह पंचायत समिती सदस्य ऍड. हर्षल चौधरी, डॉ. कमलाकर पाटील, मिलींद चौधरी, नंदू पाटील यांनी गट विकास अधिकारी शकुंतला सोनवणे यांच्या दालनात जावून प्रश्‍न उपस्थित करत अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी मागणी केली.

319 घरकुले मंजूर
तालुक्यातील इंदिरा आवास योजनेतंर्गत 319 जणांना घरकुल मंजूर झाले आहे. यातील केवळ 31 जणांनाच अनुदानाचे तीनही हप्ते मिळाले असून, 284 लाभार्थ्यांना केवळ एकच हप्ता मिळाला आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 844 लाभार्थी आहेत. यामधील देखील अनेकांना रक्कम मिळालेली नाही.

9 मेला पुन्हा बैठक
घरकुल योजनेतील अनेक लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. तालुक्यातील अशा लाभार्थ्यांची बैठक पुन्हा बोलाविण्यात आली असून, 9 मे रोजी बीडीओंच्या दालनात दुपारी दोनला बैठक होणार आहे. तरी लाभापासून वंचित लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सदस्य ऍड. हर्षल चौधरी यांनी केले.

सर्व्हर डाऊनची समस्या
लाभार्थ्यांच्या खात्यात सदर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पंचायत समितीकडून अनुदानाची रक्कम ऑनलाईन टाकली जात आहे. परंतू, सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत असल्याने खात्यात रक्कम टाकण्यास एक महिना होवून देखील जमा होत नसल्याची समस्या येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच कर्मचारी संख्या कमी असल्याची समस्या देखील बीडीओ सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आली.