Private Advt

घनकचरा व्यवस्थापनाचे साहित्य न पुरवता ग्रामपंचायतीची फसवणूक : ठेकेदार गुन्हे शाखेच्या जाळ्यात

भुसावळ/जळगाव : विकासकामांसाठी लागणारे घनकचरा व्यवस्थापनाचे साहित्य न पुरवता जामनेर तालुक्यातील नाचणखेडा ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील ठेकेदाराच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भास्कर मार्केटमधून मुसक्या आवळल्या आहेत. विरेंद्रकुमार राजेंद्र पाटील (मायादेवी मंदिरामागे, महाबळ, जळगाव) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

नाचणखेडा ग्रामपंचायतीची केली फसवणूक
जामनेर तालुक्यातील नाचणखेडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकाने गावाच्या विकासकामांसाठी लागणारे घनकचरा व्यवस्थापन साहित्य खरेदीसंदर्भात विरेंद्रकुमार पाटील याला कामाचा मक्ता दिला होता. या कामासाठीचे पाच लाख 57 हजार 100 रुपये विरेंद्र कुमार याने घेतले मात्र प्रत्यक्ष विकासकामांसाठी लागणारे साहित्य पुरवलेच नाही त्यामुळे या प्रकरणी विरेंद्र कुमार पाटील याच्याविरोधात पहूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच वर्षभरापासून संशयीत विरेंद्रकुमार हा पसार होता. संशयीत जळगावातील भास्कर मार्केट परिसरात असल्याची गोपनीय माहिती शनिवारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली व आरोपीला पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देवरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल अशरफ शेख, सुनील दामोदरे, लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.