Private Advt

ग.स.सोसायटीसाठी मतमोजणीला सुरुवात

जळगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी नोकरांची सोसायटीसाठी गुरुवार, 28 रोजी निवडणूक झाल्यानंतर शनिवार, 30 रोजी जळगाव विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यासह जिल्ह्यात प्रथितयश तसेच नावाजलेल्या सर्वात मोठ्या अशा जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सोसायटीची निवडणूक मतदान प्रक्रिया 28 एप्रिल रोजी किरकोळ अपवाद वगळता पार पडली होती.

69 टेबलावर मतमोजणी
ग.स.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या 21 जागांसाठी 115 उमेदवार रींगणात असून या निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवार, सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली आहे. मतमोजणीसाठी 69 टेबल लावण्यात आले असून निवडणुकीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हॉलच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीसाठी 69 टेबलांवर 207 मतदान अधिकारी आणि कर्मचारी काम करीत आहे. तसेच 7 सहाय्यक निबंधकही मतमोजणीकामी देखरेख करीत आहेत. सुरवातीलाच मतपत्रिकाची विभागणी करून बाहेरील मतदार संघाच्या मतमोजणीला प्रारंभ झाला.

12 तासात निकाल येणार हाती
ग.स.सोसायटीची संपूर्ण मतमोजणी 12 ते 14 तासात पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याची माहिती सहकार निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली. दरम्यान, ग.स.सोसायटीच्या निवडणुकीच्या 21 जागांसाठी लोकसहकार, लोकमान्य (संस्थापक प्रगती) गट, सहकार गट, प्रगती शिक्षक सेना गट, स्वराज्य पॅनल यांच्यासह मातब्बर उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.