ग. स. सोसायटीच्या 14 संचालकांचे घाऊक राजीनामे

0

जळगाव: जिल्हा सहकारी नोकरांची पतपेढीच्या सत्ताधार्‍यांसह विरोधी गटातील 14 संचालकांनी सामूहिकरित्या राजीनामे गुरुवारी जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केले. ग. स. च्या संचालकांनी घाऊक राजीनामे दिल्यामुळे सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी राजीनामा सत्राबाबत दुजोरा दिला आहे.

शासकीय नोकदारांची पतपेढी म्हणून ग. स. सोसायटीकडे बघितले जाते. परंतु आता यातदेखील राजकीय पुढार्‍यांचा समावेश झाला असून, ग. स.च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गदारोळ होणे हे नित्याचेच झाले आहे. सन 2015 ते 2020 या कालावधीसाठी 21 संचालक निवडून आले होते. 4 जून रोजी, संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने निवडणूक घेण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सोसायटीचे विद्यमान काळजीवाहू अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील हे संचालक मंडळाच्या सदस्यांना विश्‍वासात न घेता संस्थेच्या व सभासदांच्या हिताविरोधात एकतर्फी निर्णय घेत आहेत. तसेच संचालकांना अरेरावी व अपात्रतेची भाषा वापरुन त्यांच्यासोबत हुकूमशाही पद्धतीने कामकाज करुन अध्यक्षपदाचा गैरवापर करुन संस्थेचे व सभासदांच्या हिताविरोधात निर्णय घेत आहे. त्यामुळे बहुतांश संचालकांचा त्यांच्यावर विश्‍वास राहिला नाही, असा दावा काही जण करत आहेत. शिवाय संचालक मंडळाचा कार्यकाळही संपलेला असताना 14 संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा आज जिल्हा उपनिबंधक संतोष बीडवई यांच्याकडे सादर केला.

राजीनामा देणारे संचालक पुढीलप्रमाणे
सत्ताधारी गटाचे विलास नेरकर, तुकाराम बोरोले, सुनील अमृत पाटील, सुनील निंबा पाटील, विश्‍वास सूर्यवंशी यांच्यासह सहकार गटाचे गटनेते उदय पाटील, अजबसिंग पाटील, कैलास चव्हाण, महेश पाटील, देवेंद्र पाटील, विद्यादेवी पाटील, विक्रमादित्य पाटील, भाईदास पाटील, रागिणी चव्हाण या 14 संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Copy