ग्लासखाली बॉम्ब लावल्याने धुळ्यात मुलाचा मृत्यू

Toddler dies in twine bomb blast in Dhule धुळे : ग्लासखाली ठेवलेला सुतळी बॉम्ब फुटल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना जुने धुळे परीसरातील जुनी भिलाटीत सोमवारी रात्री घडली. सोनू ऊर्फ मल्या कैलास जाधव (15) असे मयत मुलाचे नाव आहे. कैलासने सुतळी बॉम्बचा जोरदार आवाज होण्यासाठी स्टीलच्या ग्लासखाली ठेवून फोडल्याने त्याचे तुकडे अंगावर उडाल्याने तो जागीच ठार झाला. कुटुंबीयांनी चिमुकल्याचे शवविच्छेदन न करता मंगळवारी पहाटे दफनविधी केला मात्र पोलिसात प्रकरण गेल्यानंतर प्रशासनाच्या परवानगीने बुधवारी मृतदेह उकरून शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुतळी बॉम्ब ठरला मरणाचे कारण
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री शहरातील जुन्या भिलाटीत मुले फटाके फोडत असताना सोनूनेदेखील फटाक्यांचा मोठा आवाज होण्यासाठी त्याने स्टीलच्या ग्लासखाली बॉम्ब लावला व बॉम्ब फुटताच त्यातील तुकडे सोनूच्या अंगावर उडाल्याने तो गंभीर जखमी होवून जागीच गतप्राण झाला. जाधव कुटुंबीय व नातलगांनी ही घटना पोलिस व प्रशासनाला न कळवता मंगळवारी पहाटे सोनूचा दफनविधी उरकला.

शवविच्छेदनासाठी तहसीलदारांकडे पत्रव्यवहार
सोनूच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी कुटुंबीयांनी नकार दिल्याने पोलिसांनी मंगळवारी तहसीलदारांकडे पत्र देऊन शवविच्छेदनाची परवानगी मागितली. आज, बुधवार, 26 रोजी सक्षम अधिकार्‍याच्या उपस्थितीत सोनू याचा मृतदेह उकरण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.