ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी तळोद्यात क्रीडासंकुल अंतिम टप्प्यात

0

तळोदा । ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये उपजत क्रीडा गुण व कौशल्य असते. मात्र आधुनिक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे संधी मिळत नाही. या गोष्टीला लक्षात घेऊन तळोदयात लवकरच क्रीडासंकुलाचे दालन क्रीडापटूसाठी उघडे होणार आहे. याबाबत नुकतीच तळोदा शासकीय विश्राम गृहात येथे आमदार उदयसिंग पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी शरद मगर, पोलीस निरीक्षक संजय भामरे, रमेश जावरे व क्रीडाशिक्षक प्रतिनिधी सुनील सूर्यवंशी उपस्थित होते. तळोदा तालुका क्रीडा संकुलाची इमारत बांधून तयार झाली आहे. परंतु त्याचे क्रीडा संकुल प्रशासनाकडे हस्तांतरण न झाल्यामुळे उर्वरित काम रखडलेले होते.

हस्तांतरण तांत्रिक अडचणीमुळे थांबले : मागील 1 वर्षांपासून संकुलाचे काम पूर्ण होऊन देखील हस्तांतरण तांत्रिक अडचणीमुळे थांबले होते. संकुलाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. लवकरच हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होऊन हे संकुल खेळाडूंसाठी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील खेळाडूं व क्रीडा पटूंना हक्काचे स्थळ उपलब्ध होणार आहे. संबंधित ठेकेदाराने अद्यापपावेतो संकुलाची इमारत क्रीडा संकुल प्रशासनाकडे हस्तांतरित केलेली नव्हती. त्यामुळे उर्वरित कामास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. इमारत हस्तांतरित झाल्यानंतरच क्रीडा संकुलाचा इमारतीत बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आदी खेळांचे तर परिसरात खो – खो, कबड्डी आदी खेळांसाठी आवश्यक असणारे साहित्य व त्यासाठी लागणारे मैदान तयार करता येणार आहे.

विविध मैदाने तयार करणार
तालुका क्रीडा संकुल परिसर सपाटीकरण पुढील टप्प्यात होणार असून विविध मैदान तयार करण्यात येतील. तालुका क्रीडा संकुलाची इमारत लवकरच शहर व तालुक्यातील खेळाडूसाठी उघडले जाणार आहे. त्यामुळे खेळाडू व क्रीडा प्रेमींमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तळोदयातील आय. टी. आय. कॉलेजच्या शेजारी तालुका क्रीडा संकुलाचा बांधकामासाठी आमदार उदेसिंग पाडवी यांनी क्रीडा संकुलाचा निर्मितीकडे विशेष लक्ष दिले. आमदार पाडवी यांचा प्रयत्नांतून काही महिन्यातच क्रीडा संकुलाची इमारत उभी राहिली. त्यामुळे लवकरच क्रीडा संकुल तयार होवून त्याचा उपयोग खेळाडूंना घेता येईल अशी आशा खेळाडूंमध्ये व क्रीडा प्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.

क्रीडा संकुलामुळे ग्रामीण भागातील खेळाडुंना हक्काचे मैदान प्राप्त होईल.
बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ यांसारख्या इनडोअर खेळांचा प्रसार व प्रचार होईल.
अस्सल ग्रामीण खेळ असलेले खो – खो, कबड्डी यांना चालना मिळेल.
खेळाडुंना अद्यावत सोयी सुविधा व प्रशिक्षण प्राप्त होईल आणि त्याचा त्यांना भविष्यात फायदा होईल.