ग्रामरोजगार सेवकांचे मानधन रखडले

0

मानधनासाठी गटविकास अधिकार्‍यांना निवेदन
तळोदा: तालुक्यात ग्रामरोजगार सेवकांचे मानधन रखडल्यामुळे रखडलेले मानधन तात्काळ मिळावे, या मागणीसाठी ग्रामरोजगार सेवकांनी गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांना निवेदन दिले.

कुटुंबियांवर उपासमारीची वेळ 
रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारे मजूर आणि शासन यामधील दुवा म्हणून ग्रामरोजगार सेवक काम करीत असतात. मस्टर मागणी करणे, जमा करणे, एमबी रेकॉर्ड करून जमा करणे, जॉब कार्ड करणे आदी व प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कामांवर हजेरी घेणे, हजेरीपत्रक भरणे, त्यांची मजूरी त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे आदी कामे ग्रामरोजगार सेवक करीत असतात. गाव पातळीवरील ग्रामरोजगार सेवकांना मार्च महिन्यापासूनचे मानधन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात शासनाने काम करणार्‍या ग्रामरोजगार सेवकांवर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही व संपूर्ण शासनाने परराज्यात परतलेल्या मजूरांना रोजगार देण्यासाठी व्यापक प्रमाणात रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी रोजगार सेवकांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. रोजगार सेवकांनी केलेल्या कामामुळे जिल्ह्यात परतलेल्या मजूरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय प्रशासनाला गाठता आले आहे. मागील काही दिवसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेअंतर्गत काम झाले आहे. या कामावर रोजगार सेवकांचे मानधन अवलंबून असते.

ग्रामरोजगार सेवक आर्थिक विवंचनेत
असे असताना प्रशासनाने रोजगार सेवकांच्या मानधनाकडेच दुर्लक्ष केले आहे. मागील तीन महिन्यापासून रोजगार सेवकांचे मानधन न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रोजगार सेवकांच्या मेहनतीमुळेच या योजनेअंतर्गत अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, मानधनाविना तालुका मुख्यालयी जाऊन व प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी विविध भूमिका पार पडणारे ग्रामरोजगार सेवक मानधनाअभावी आर्थिक विवंचनेत सापडले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर ग्राम रोजगार सेवक संघटनेचे रुपसिंग चौधरी, संजय ठाकरे, फुलसिंग वसावे, गोपाल वळवी, महेंद्र वळवी, शांताराम पाडवी, राकेश वळवी, सुहास तडवी, रवींद्र वसावे,रायसिंग पाडवी, हिरालाल पाडवी, पंडित पाडवी, विनायक पाडवी, मगन पाडवी, यांच्यासह तालुक्यातील अनेक ग्रामरोजगार सेवकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Copy