ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी

0

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील आणखी 1,456 कोटी रुपयांचा निधी प्राप्त

मुंबई: राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखीन 1,456 कोटी 75 लाख रुपयांचा अबंधीत निधी प्राप्त झाला आहे. हा निधी  जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात आला असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे 80:10:10 प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्तीय वर्ष 2020-21 करिता एकुण 5,827 कोटी रूपये निधी मंजूर आहे. यापैकी यापुर्वी 1,456 कोटी 75 लाख रुपयांचा अबंधीत निधी तसेच 1,456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी असा एकूण 2,913 कोटी 50 लाख रुपये इतका निधी पहिल्या हप्त्यापोटी प्राप्त झाला होता. हा निधी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना विकास कामांवर खर्च करण्यासाठी यापुर्वीच वितरीत करण्यात आला आहे. आता दुसर्‍या हप्त्यापोटी 1,456 कोटी 75 लाख रुपयांचा अबंधीत निधी प्राप्त झाला असून तो आज जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात आला आहे.पं.स आणि ग्रा.पं.ना हा निधी तत्काळ वितरीत करण्यात येईल. आतापर्यंत 4,370 कोटी 25 लाख रूपये निधी प्राप्त झाल्याचे मुश्रीफ म्हणाले.

Copy