गो-सेवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा झाला समारोप

0
शेती व जनावरांच्या विविध आजार-रोगांवर घरगुती व स्वस्त उपायांचे केले मार्गदर्शन
दोन दिवसीय शिबिरात घेतली सेंद्रीय शेतीची माहिती
नाणेमावळ :  कामशेत येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामशेत शाखेच्यावतीने 2 दिवसांचे गो सेवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप नायगावातील साई सेवा धाम येथे करण्यात आला. प्रशिक्षणच्या दुसर्‍या दिवशी गो-सेवा करणार्‍या कार्यकर्त्यांना व शेतकरी बांधवाना गो-मातेचे विविध फायदे सांगण्यात आले. तसेच सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी व त्याचे फायदे सांगण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या आजारांवर घरगुती उपाय योजना, शेती व जनावरांच्या विविध आजार-रोगांवर घरगुती व स्वस्त उपाय करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. देशी गायी या जिवंतपणी तिच्या प्रत्येक घटकातून फायदा मिळवून देतेच; परंतु तिच्या मृत्यू नंतरही ठराविक प्रक्रियेतून जीवाश्म खताचीही निर्मिती करता येते, अशी माहिती अखिल भारतीय गोसेवा समितीचे अध्यक्ष शंकर लालजी यांनी दिली.
गोबरगॅसचे दिले प्रशिक्षण
गो-मातेचे गोमूत्र, शेण यांपासून गोअर्क व गोबरगॅस कसा तयार करण्यात येतो. याविषयीचे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले. गो-मातेच्या याविविध फायद्याची माहिती समाजाच्या उन्नतीसाठी सर्वत्र पोहचवून गोवंश टिकवण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण देशात गो-सेवा चळवळ निर्माण करण्यासाठी तात्या मगर व सुरेश घाडगे या गो-सेवा करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात गो-सेवा कार्यकर्ता प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती शेखर धर्माधिकारी यांनी दिली.
स्वयंसेवकांनी घेतले परिश्रम
या वेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती राजाराम शिंदे, अनंत चंद्रचूड, देवराईचे संस्थापक सुकन बाफना आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र रबडे यांनी केले. तालुका गो-सेवा समितीचे अध्यक्ष विक्रम बाफना, शंकर शिंदे, शंकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन शिंदे, युवराज शिंदे, प्रसाद उंडे, निखिल वाबळे, धनंजय पिंगळे, आनंद शिंदे, विक्रम वाळूंज आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
Copy