गोव्यात पर्रिकर सरकारने बहुमताचा ठराव जिंकला

0

पणजी : गोव्यातील मनोहर पर्रिकर सरकारने गुरूवारी अगदी सहज बहुमताचा ठराव जिंकला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुरूवारी सकाळी अकरा वाजता विधासभेचे विशेष सत्र घेऊन पर्रिकर सरकारने 22 आमदारांसह आपले संख्याबळ सिध्द केले. गोवा विधानसभेत एकुण 22 आमदारांच्या जागा आहेत. या विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी सरकारच्या विरोधात केवळ 16 मते पडली. यावेळी काँग्रेसमध्ये एकजुट दिसून आली नाही. काँग्रेसचे आमदार विश्‍वजीत राणे यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. पर्रिकर सरकारने बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर मतदानावर बहिष्कार टाकणारे काँग्रेसचे आमदार विश्‍वजीत राणेंनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस नेतृत्वावरच नाराजी व्यक्त केली.

भाजपाची जय्यत तयारी
सुरवातीपासूनच पर्रिकर सरकार विश्‍वासदर्शक ठराव जिंकणार असे गृहीत धरले गेले होते. कारण भाजपाने तेवढ्या संख्याबळाची जमवाजमव अगोदरच केली होती. पर्रिकर 22 आमदारांचे समर्थन असल्याचे सांगत होते. तर 21 आमदारांचे संख्याबळ सरकार स्थापनेसाठी आवश्यक होते. संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देऊन चौथ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्री विराजमान झालेले 61 वर्षीय परिकर यांना त्यांचे मित्रपक्ष गोवा फॉरवर्ड पार्टी 3, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी 3 आणि अपक्ष यांचे समर्थन मिळाले आहे. भाजपाने गोवा विधानसभा निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला होता. तर मंगळवारी पर्रिकरांनी नऊ मंत्र्यांसह शपथ घेतली होती.

काँग्रेसकडे बहुमत नव्हतेच
बहुमताचा ठराव जिकल्यानंतर पर्रिकर म्हणाले, आम्ही 22 आमदारांसह ठराव जिंकला आहे. अध्यक्षांनी हात उंचावण्यास सांगून मतदान घेतले. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे बहुमत सिध्द केले आहे. भाजपाकडे तसे 23 आमदारांचे बळ आहे. परंतू अध्यक्ष मतदान करू शकत नाहीत. काँग्रेसकडे सुरवातीपासूनच बहुमत नव्हते. पर्रिकर यांनी काँग्रेसच्या राणे यांच्या बहिष्काराबाबत बोलण्यास मात्र नकार दिला.

अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे नुकसान
काँग्रेसने गोव्यात भाजपापेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. मात्र पक्षाचा गटनेता निवडण्यापासून अंतर्गत गटबाजीने तोंड वर काढल्याने सरकार स्थापनेचा दावाही काँग्रेस करू शकली नाही. त्यानंतर पर्रिकरांचा शपथग्रहण सोहळा थांबविण्यासाठी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतू उलट काँग्रेसलाच फटकारत न्यायालयाने शपथग्रहण सोहळा न थांबवता पर्रिकर सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगितले. काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी सरकार स्थापन्यात अपयश आल्याबद्दल दिग्विजय सिंह यांनाच जबाबदार धरले आहे.

विश्‍वजीत राणेंचा राजीनामा
काँग्रेसचे आमदार विश्वजीत राणे यांनी गुरुवारी आमदारकी आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला.’मी या पक्षाला कंटाळलो आहे’ अशा शब्दात त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. राणे म्हणाले, मतदारांचे मत जाणून घेतल्यानंतर मी अंतिम निर्णय घेईन. गोव्यातील निकालानंतर विश्वजीत राणे हे पक्षनेतृत्वावर नाराज होते. पक्षातील निर्णय प्रक्रिया संथ असून 17 जागा जिंकूनही सत्ता स्थापन करण्यात आलेल्या अपयशासाठी पक्षनेतृत्वच कारणीभूत असल्याचा आरोप विश्वजीत राणे यांनी केला होता. यासाठी कोणाला एकाला जबाबदार ठरवता येणार नाही. पण पक्षाला अपयश आले हे मान्य करावेच लागेल असे त्यांनी नमूद केले होते.