गोलाणीत तरूणाच्या डोक्यात पडला काच

0

जळगाव । पाणी पिण्यासाठी तिसर्‍या मजल्यावरून तरूण पायर्‍यांनी खाली उतरत असतांना त्याच्या डोक्यावर अचानक चौथ्या मजल्यावरील एका दुकानाच्या खिडकीचा काच डोक्यावर पडला. डोक्यात काच पडताच रक्ताच्या धारा लागल्या. यानंतर त्याला तरूण काम करीत असलेल्या दुकान मालकांनी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. ही घटना गोलाणी मार्केटमध्ये सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. सैय्यद जुबेर सैय्यद जहांगिर (वय-18) हा धरणगांव येथील रहिवासी आहे. जुबरे याचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले असून मोबाईल दुरूस्तीचे काम शिकण्याची आवड असल्याने त्याने शहरातील गोलाणी मार्केटमधील तिसर्‍या मजल्यावरील अभिनव मोबाईल येथे क्लास लावला. त्यामुळे जुबेर हा रेल्वेने जळगाव-धरणगांव ये-जा करत होता. त्यातच आज नेहमीप्रमाणे जुबेर हा सकाळीच क्लासला (दुकानात) आला.

पाणी पिण्यासाठी जात होता तरूण
तहान लागल्याने मार्केटच्या तळमजल्यावर पिण्याच्या पाण्याची सुविधा असल्याने तो सकाळी 9.30 वाजता मोबाईल दुकानातून बाहेर निघाला व पायर्‍या उतरू लागला. यातच चौथ्या मजल्यावरील एका दुकानात तरूण सफाई करत होता. सफाई करत असतांना दुकानातील खिडकीचा काच निघून खाली आला आणि तो जुबरे याच्या डोक्यात पडला. काच डोक्यात पडताच जुबरेला गंभीर इजा होवून डोक्यातून रक्ताच्या धारा लागल्या. काच पडल्याचा आवाज येताच मार्केटमधील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तर जुबेर हा शिकत असलेल्या दुकानातील बापु सर यांना घटना लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जुबेरला खाजगी रुग्णालयात नेले. परंतू जखम गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयातून त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.

डॉक्टरांनी लागलीच त्याच्यावर उपचार केले. मुलाच्या डोक्यात काच पडल्याची माहिती मिळताच जुबरे याचे वडील सैय्यद जहांगिर व मोठा भाऊ सैय्यद निसार तसेच नातेवाईक यांनी सकाळीच जिल्हा रूग्णालय गाठले. दरम्यान, जुबेर याची पकृति स्थिर असून या घटनेत जुबेर हा बालंबाल बचावला.