गोरगरीबांना मिळणार हक्काचा निवारा ; लवकरच होईल स्वप्नपूर्ती

0

भुसावळात आमदार संजय सावकारेंनी केले लाभार्थींना आवाहन ; प्रधानमंत्री आवास योजनेचे शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वेक्षण

भुसावळ- केंद्रातील भाजप सरकारने गोरगरीबांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून या योजनेच्या प्रभागनिहाय सर्वेक्षणाचा उपक्रम शहरात राबवला जात आहे. यापूर्वी तीन प्रभागांत या योजनेचे सर्वेक्षण करुन नागरीकांना माहिती देण्यात आली. आता प्रभाग आठच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब नागरीकांच्या हक्काच्या निवार्‍याचा प्रश्न सुटेल व प्रत्यक्षात घराची स्वप्नपूर्ती होईल, असा आशावाद आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केला. शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील नागरीकांसाठी शुक्रवारी लोणारी समाज मंगल कार्यालयात झालेल्या सर्वेक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

अधिकाधिक लाभार्थींनी घ्यावा सहभाग
आमदार सावकारे म्हणाले की, या योजनेत अधिकाधिक लोकांनी सहभाग नोंदवावा. नागरीकांना लाभ मिळवून देण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत करावी. या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्व निकषांची पूर्तता करणे अत्यंत सोपे आहे मात्र गोरगरीब लाभार्थ्यांचे शिक्षक कमी असल्याने त्यांना पूर्तता करणे क्लिष्ट वाटते, यामुळे मनात न्युनगंड न बाळगता शासनाने तुमच्यासाठी सुरू केलेल्या या योजनेतून अधिकाधिक घरांचे निर्माण व्हावे, लाभ मिळावा यासाठी कागदपत्रांची पूर्तता करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, गटनेता मुन्ना तेली, माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा प्रभाग आठचे नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक किरण कोलते, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर, किशोर पाटील, सतीश सपकाळे, देवेंद्र वाणी, भाजपच्या शहर महिला अध्यक्षा मिना लोणारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या अधिकार्‍यांनीही माहिती दिली. यावेळी प्रभाग क्रमांक आठमधील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वसामान्यांना हक्काचा निवारा देणार -नगराध्यक्ष
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातूनही सर्वसामान्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. योजनेचे निकष पूर्ण करणार्‍या लाभार्थींना हक्काचा निवारा देण्यात येईल, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. केंद्राची ही योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.