Private Advt

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ मुंडे चौक येथे रविवारी प्रतिमापूजन

जळगाव (प्रतिनिधी) : दिवंगत केंद्रीय मंत्री तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे रॅली न काढता प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे. समाज बांधवांनी उपस्थिती देण्याचे आवाहन कार्यक्रम समन्वयक तथा मनपाचे स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांनी केले आहे.

दिवंगत केंद्रीय मंत्री तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे त्यांच्या विविध क्षेत्रातील गौरवास्पद कार्यामुळे आजही ओळखले जातात. दरवर्षी शहरात शिवतीर्थ मैदान ते मेहरूणमधील लाडवंजारी मंगल कार्यालयपर्यंत भव्य वंदन रॅली काढण्यात येत असते. यंदा कोरोना महामारीमुळे समाज जीवन विस्कळीत झाले आहे.

पुढील काळात येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीने भव्य रॅली न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मेहरूण मधील लोकनेते गोपीनाथराव मुंडेजी चौक येथे प्रतिमा पूजन करून गोपीनाथराव मुंडे यांना व त्यांच्या कार्याला वंदन करण्यात येणार आहे. समाज बांधवांनी मास्क घालून सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये उपस्थिती देऊन गोपीनाथराव मुंडे यांना व त्यांच्या कार्याला वंदन करावयाचे आहे.

प्रतिमापूजन कार्यक्रमासाठी अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, उपाध्यक्ष विजय वंजारी, सचिव प्रवीण सानप, कार्यक्रम समन्वयक तथा मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. समाज बांधवांनी मास्क घालून फिजिकल डिस्टंसिंग ठेवून गोपीनाथराव मुंडे यांना वंदन करण्यासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.