गोडाऊन फोडून 47 लाखांचा ऐवज लंपास

0

जळगाव । शहरातील भजे गल्ली परिसरात असलेले भारद्वाज एजन्सी हे सिगारेटचे गोडावून व कार्यालय गुरूवारी अज्ञात चोरट्यांनी फोडून गोडावून मधील 45 लाखांचे सिगारेटच्या खोक्यांसह 2 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस घडली. दरम्यान, सहा चोरट्यांनी 2 वाजेच्या सुमारास गोडावूनचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सिगारेटचे खोके मालवाहू बोलेरो व स्विफ्ट डिझायर या गाडीतून वाहून नेत चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. याप्रकरणी गोडावून मालक सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटेनगर परिसरातील दादावाडी येथील रहिवासी सुरेश पुंडलिक पाटील यांचे भारद्वाज नावाने एजन्सी आहे़ तसेच संतोष ट्रेडर्स नावाने त्यांचे भाऊ रामचंद्र पाटील यांची एजन्सी आहे. दोघे वेगवेगळ्या कंपनीचे सिगारेटचे किरकोळ विक्रेते आहेत. कांताई सभागृहालगत असलेल्या चोपडा मार्केटमध्ये दहा वर्षापासून त्यांचे संतोष मेडीकल तसेच कार्यालय व त्यातच खाली गोडावून आहे. दर दोन दिवसांनी त्यांचा नागपूर येथून माल येतो. त्याप्रमाणे मंगळवारी त्यांचा सिगारेटचा माल आला होता. त्यामुळे पाटील यांनी तो माल गोडावून मध्ये ठेवलेला होता. यानंतर आज चोरी झाल्याचे उघडकीस आले.

गुरूवारी 26 जानेवारीला रात्री 9 वाजेपर्यंत गोडावून उघडे होते. काम आटोपल्यावर कामगारांनी गोडावून बंद करून कामगार घराकडे रवाना झाले. सकाळी नेहमीप्रमाणे 9 वाजता कामगार विलास पाटील हा गोडाऊन उघडण्यासाठी आल. त्याला शटरचे दोन्ही कुलूप तुटलेले दिसले. त्याने तत्काळ मालक सुरेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. चोरी झाल्याचे कळताच सुरेश पाटील यांनी भाऊ रामचंद्र पाटील यांच्यासह दुकान गाठले. दुकानाच्या आतील दरवाजाचे लॉक उघडून सिगारेटचे 67 खोके लांबविल्याचे तर वरच्या मजल्यावर असलेले कार्यालयात ठेवलेले 2 लाख रूपयांची रोकड लांबविल्याची समजले. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटना कळविली. सीसीटीव्ही फुटेजनुसार गुरूवारी मध्यरात्री 12 ते 3 दरम्यान चोरट्यांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे़ यातच घटनेची माहिती मिळताच डीवाएसपी सचिन सांगळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहिले. यानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांना त्यांनी तपासाच्या सुचना केल्या. त्यानुसार शनिपेठ, रामानंदनगर, जिल्हापेठ, औद्योगिक वसाहत व शहर पोलीस ठाण्यांमधील एक ते दोन गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. प्रत्येकाने सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले व चोरट्यांचा शोध सुरू केला.

अशी केली चोरी
12 वाजेच्या सुमारास प्रारंभी दोन जण चोपडा मार्केट परिसरात आले. त्यांनी भजे गल्लीपरिसर टेहळणी केली. यानंतर पुन्हा दुकानाजवळ तीन जण एकत्र आले. त्यापैकी दोघांनी शटरचे कुलूप तोडले. कुलूप तोडल्यानंतर यानंतर तिघापैकी एक जण आतमध्ये शिरला. त्याने आतील लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून मालाची खात्री केली व तो पुन्हा बाहेर आला. काही वेळाने मालवाहू बोलेरा त्या ठिकाणी आल्यानंतर आत शिरलेल्या चोरट्याने सिगारेटचे खोके बाहेर तिघांना देवून तिघांनी गाडीत भरले. माल भरल्यावर 27 मिनिटांनंतर ही गाडी रवाना झाली व काही सेकंदाच दुसरी पांढर्‍या रंगाची स्विफ्ट कार घटनास्थळी आली. यामध्ये उर्वरीत माल भरला व यानंतर 2 वाजून 40 मिनीटांनी गाडीसह चोरटे रवाना झाले. चोरट्यांनी सिगारेट गाडीत खाली करून खोके बाहेर फेकून दिले.

सुरेश पाटील यांचे कार्यालय व गोडावून तसेच शेजारच्या संतोष मेडीकल असे एकूण 11 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. गोडावून व कार्यालय असे एकूण चार व बाहेर एक असे पाच कॅमेजयांमध्ये चोरटे कैद झाले आहेत. शटर उघडताना, माल वाहून नेताना, गाडीत माल भरताना असे एकूण चार जण दिसून येत आहे. एक जण दुकानातून शटर पर्यंत माल पोहचत असून इतर तीघे गाडीत माल भरताना दिसून येत आहेत़ यादरम्यान चोरट्यांनी 67 वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिगारेटचे खोके व वरच्या मजल्यावरील कार्यालयाच्यातून पिशवीत ठेवलेले दोन लाख रूपयांची रोख असा एकूण 47 लाखांचा ऐवज लांबविला.

अन् चोरटे घाबरले
चोरीचा प्रकार सुरू असताना अचानक 2 वाजून 23 मिनीटांनी कांताई सभागृहाकडून एक पांढजया रंगाची सुमो गाडी भजे गल्लीकडे गेली़ यादरम्यान गाडीच्या लाईटमुळे चोरटे घाबरले़ व मालवाहू गाडीत जावून बसले़ गाडी गेल्यानंतर एका मिनिटांनी चोर गाडीतून बाहेर आले़ व त्यांनी पुन्हा माल गाडीत भरण्यास सुरवात केल्याचे दुकानाबाहेरील कॅमेर्‍यात कैद झाले आहे़ स्विफ्ट कारमध्ये माल भरत असताना त्यात माल बसत नव्हता़ जास्तीत जास्त माल नेता यावा यासाठी चोरट्यांनी शक्कल लढविली़ चोरट्यांनी खोके फाडले व त्यातून सिगारेटचे पाकिट भरून घेतले घेतले़ अशा प्रकारे चोरट्यांनी घटनास्थळी सिगारेट काढून घेत त रिकामे खोके घटनास्थळी फेकल्याचे फुटेजमध्ये दिसून येत आहे़