गोंदेगाव येथून बैल जोडी चोरीला; महिन्या भरातील दुसरी घटना

0

शेंदुर्णी : जामनेर तालुक्यातील जामनेर -पाचोरा मार्गावरील गोंदेगाव येथील शेतकरी धनराज देवरे यांची 50 हजार किंमतीची बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी रात्री मालवाहतूक गाडी गावाबाहेर उभी करुन त्यात बैल जोडी नेली असल्याची खुण दिसत आहे. एैन रब्बी हंगाम मशागतीच्या काळात एवढ्या मोठ्या किंमतीची बैलजोडी चोरी गेल्याने शेतकर्‍यासमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. सदरील घटना पोलिसांना कळविले असल्याचे समजते. दरम्यान महिन्याभरापूर्वी गोंदेगाव येथूनच बैलजोडी चोरीला गेल्याची घटना घडली होती. महिन्याभरातील चोरीची ही दुसरी घटना असल्याने जनावरांचे संरक्षण कसा करावा? असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.