गोंदियात आश्रमशाळेतील 80 विद्यार्थ्यांना त्वचारोग

0

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील किरशान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल या आश्रमशाळेतील 80 विद्यार्थ्यांना तवा नावाचा त्वचारोग झाला आहे. हा त्वचारोग संसर्गजन्य असल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने या मुलांवर उपचार न करता त्यांना घरी पाठवले आहे. एवढ्यावरच न थांबता शाळेच्या संचालकांनी मांत्रिकाला बोलावून पूजापाठही केले आहेत. ही धक्कादायक बाब आहे.

उपचाराविनाच या सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवले

गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यामध्ये किरशान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल ही आश्रमशाळा आहे. या शाळेतील 80 विद्यार्थ्यांना तवा या संसर्गजन्य त्वचारोगाची लागण झाली आहे. संसर्गजन्य त्वचारोग असल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने उपचाराविनाच या सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे. घरी पाठवलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही याची लागण झाली आहे. इतर मुलांनाही या रोगाची लागण होऊ नये यासाठी शाळेतील 285 विद्यार्थ्यांनाही घरी पाठवण्यात आले, असे संचालकांचे म्हणणे आहे. मात्र, यावर उपचार करण्याबाबत संस्थेने कसलाही खुलासा केलेला नाही. उपचाराविनाच मुलांना घरी पाठवल्याने आदिवासींच्या नावावर पैसे लाटणार्‍या शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत किती उदासीन आहेत, हे पुन्हा उघड झाले आहे.

चेहर्‍यावर आणि अंगावर मोठे फोड येतात

तवा त्वचारोगामध्ये चेहर्‍यावर आणि अंगावर मोठे फोड येतात. या रोगाची लागण झाल्यास चामडीही जाते. हा रोग संसर्गजन्य आहे. याची लागण इतरांच्या संपर्कात आल्यास होते आणि लागण झालेल्यांमध्ये सारखीच लक्षणे दिसून येतात. सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे शाळेच्या संचालकांनी मांत्रिकांकडून पूजापाठही करून घेतले आहेत. यासंदर्भात शाळा प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.