गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित अन् कोरोनामुक्त दोन्ही वाढले

0

नवी दिल्ली – कोरोनामुळे देशात गेल्या ४२ दिवसांपासून लॉकडाऊन सुरु आहे. मात्र लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळण्यास सुरुवात झाल्यापासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांमध्ये आतापयर्र्ंत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३९०० नवे रुग्ण आढळले असून १९५ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताचा मृत्यूदर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा मृत्यूदरात वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या २४ तासात देशभरात १०७४ लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामुळे आता बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण २७.५२ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
देशभरात करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली ४६, ४३३ वर, तर त्यांपैकी १२,७२७ रुग्ण बरे झाले आहे. तर आता एकूण ३२,१३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. ३० एप्रिलपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या १०७५ होती. परंतु गेल्या चार दिवसांत हा आकडा १५००च्या वर गेला आहे. म्हणजेच गेल्या चार दिवसात जवळपास ५०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा रविवारी संपल्यानंतर देशातील विविध भागात मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या रेड झोनमध्येही दारुची दुकाने उघडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले होते.

दररोज १ लाख चाचण्या

भारतामध्ये दर दहा लाख लोकांमागे फक्त ६९४ लोकांचीच कोरोना चाचणी होत आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, भारतात आतापर्यंत लाखो लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. देशात दररोज १ लाख लोकांची चाचणी करण्याचे लक्ष्य आहे.

Copy