Private Advt

गॅस सिलेंडरची अवैधपणे विक्री : जळगावच्या तरुणास अटक

जळगाव : शहरातील एस.टी.वर्क शॉपसमोर कोणताही परवाना नसताना व्यावसायीक कारणासाठी अवैधरीत्या गॅस सिलिंडरची विक्री करणार्‍या तरुणाविरोधात शनीपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मंगेश सुरेश कुंवर (36, रा.लक्ष्मणभाऊ नगर, एस.टी.वर्कशॉपसमोर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी गॅस भरण्याची मोटार, तीन सिलेंडरसह, इलेक्ट्रीक वजन काटा असा 12 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता 7 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगावच्या एस.टी.वर्क शॉपसमोर लक्ष्मण भाऊ नगरात मंगेश कुंवर हा तरुण अवैधपणे गॅस सिलेंडर भरुन व्यावसायीक कारणासाठी त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांना मिळाली. त्यानुसार कर्मचार्‍यांच्या पथकाने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 2 हजार 910 रुपयांचे भरलेले सिलेंडर, चार हजार रुपयांचे दोन अर्धवट भरलेले सिलेंडर, गॅस भरण्याची इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रीक वजन काटा मिळून 12 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयीत मंगेश कुंवर यास अटक करण्यात येवून त्याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहेत.