Private Advt

गुलाबरावांच्या हाती वीणा अन् खडसेंच्या हाती टाळ

जळगाव (चेतन साखरे) – राजकारणात एकेकाळी टोकाचा संघर्ष असलेल्या पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे आज भक्तिरसात चिंब होतांना दिसले. पंढरपूरच्या वारीसाठी श्री संत मुक्ताईच्या पालखी प्रस्थान सोहळ्याने या दोन्ही संघर्षयात्रींना आज एकत्र आणले. एवढेच नव्हे तर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हाती वीणा अन् एकनाथराव खडसेंच्या हाती असलेली टाळ हा जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरला.
आषाढी एकादशी निमीत्त पंढरपूरच्या वारीसाठी राज्य शासनाने यंदा मानाच्या दहा पालख्यांना वारीसाठी मान्यता दिली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील श्री संत मुक्ताई पालखीचाही समावेश आहे. श्री संत मुक्ताई पालखीचे आज प्रस्थान झाले. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पादुका पुजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा बॅकेंच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, पालखी सोहळा प्रमुख हभप रविंद्र महाराज हरणे, उद्धव जुनारे महाराज, तहसिलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, नरेंद्र नारखेडे उपस्थित होते. या सोहळ्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हाती वीणा आणि एकनाथराव खडसे यांच्या हाती असलेली टाळ हा चर्चेचा विषय ठरली. युती असतांनाही जळगाव जिल्ह्याने या दोन्ही नेत्यांमधील टोकाचा संघर्ष पाहीला आहे. अगदी अबु्रनुकसानीचे दावे दाखल करण्या इतपत प्रसंग या दोन्ही नेत्यांमध्ये घडले आहे. अध्यात्मात मोठी शक्ती असते असे म्हणतात. संत मुक्ताई पालखी सोहळ्याच्या निमीत्ताने का होइना ना. गुलाबराव पाटील व एकनाथराव खडसे हे दोन्ही संघर्षयात्री आज एकत्र आल्याचे चित्र जिल्हावासियांनी अनुभवले.