गुरूवारी मुख्यमंत्री करणार अमृत योजनेचे इ-भूमीपुजन

0

जळगाव। अमृत योजनेअंतर्गत जळगाव महानगर पालिकेचा समावेश होवून 11 महिने होवूनही या योजनेत प्रगती झाली नसल्याने पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेणार आहेत. देशात योजनांमध्ये समावेश होवूनही ज्या ठिकाणी कामांना प्रत्यक्ष सुरूवात झालेली नाही अशा योजनांचा आढावा पंतप्रधान स्वतः घेणार आहेत. या आढाव्यामध्ये शॉर्ट लिस्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये जळगावचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 तारखेला राज्यातील 8 शहरातील अमृत योजना व इतर योजनांचे इ-भूमिपुजन करणार आहेत. यातच शहरातील अमृत योजनेसंदर्भात मक्तेदाराच्या बीड कॅपॅसीटीचा मुद्दा पुढे करत औरंगाबाद खंडपीठात जैन इरिगेशन गेल्याने खंडपीठात 12 एप्रिल रोजी कामकाज होणार आहे. मक्तेदार मे. संतोष कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड इन्फ्रा प्रा. लि. अ‍ॅण्ड विजय कन्स्ट्रक्शन यांच्या ज्वाईंट व्हेंचरचे कमी दर असलेली निविदा आली असल्याने त्यांना कार्यादेश देण्याची सूचना नगरविकास विभागाकडू मनपाला प्राप्त झाल्या आहेत. खंडपीठाने 12 एप्रिलपर्यंत कार्यादेश न देण्याचे सांगितल्याने आयुक्त जीवन सोनवणे पुढील सुनावणीस स्वतः हजर राहून महानगर पालिकेची बाजू मांडणार आहेत. जर 12 एप्रिलला खंडपीठाने निर्णय दिला नाही तर कार्यादेश नसतांनाही इ-भूमीपूजन करण्याच्या सूचना महानगर पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.