गुरुकुल नगरात झाड कोसळल्याने विद्युत पोलवरील तारा लोंबकळल्या

0

जीवितहानीची शक्यता; वीज महावितरणने उपाय योजनेची मागणी

नंदुरबार:शहरातील होळतर्फे हवेली शिवारातील गुरुकुल नगरात निंबाचे झाड अचानक जमिनीवर कोसळल्याने विद्युत पोलवरील तारा लोंबकळल्या आहेत. त्यामुळे जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाहीय. विद्युत महावितरण कंपनीने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे

शहरात मे हिटचा तडाखा बसत असताना तापमानाचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. अशातच वातावरणात वाऱ्याच्या वेग वाढल्याने शुक्रवारी गुरुकुल नगरात दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास अचानक लिंबाई भवनाजवळ निंबाचे झाड अचानक जमिनीवर कोसळले. झाड कोसळल्याने परिसरात असलेल्या एका विद्युत पोलवर झाडाच्या मोठ्या फांद्या अडकल्याने तारा लोंबकळल्या आहेत.

परिसरात नेहमी कॉलनीतील रहिवाशांची ये-जा सुरू असते. लहान मुलेही अंगणात खेळत असतात. दुपारच्या वेळी उन्हामुळे सहसा नागरिक घराबाहेर पडत नाहीत. अन्यथा कोसळलेल्या झाडामुळे अनेकांना इजा झाली असती. लोंबकळणाऱ्या तारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असता सामाजिक कार्यकर्ते श्‍याम जगदाळे यांनी तात्काळ वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन कॉल करून माहिती दिली. झाड कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.

नागरिकांना इजा पोहोचण्याची शक्यता
गेल्या दोन दिवसापासून वाऱ्याच्या वेगामुळे गुरुकुल नगर कॉलनी परिसरातील विद्युत पोलवरील तारा एकमेकांच्या घर्षणामुळे ठिणग्या उडत असतात.परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांना त्यामुळे इजा पोहोचण्याची शक्यता असल्याने वीज महावितरण कंपनीकडून उपाय योजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Copy