गुरमेहरचे समर्थक पाकिस्तानी, त्यांना देशाबाहेर हाकला

0

नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात सोशल मीडियावर मोहिम उघडणारी शहीद जवानाची मुलगी व दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी गुरमेहर कौर हिच्यावर हरयाणातील भाजपचे मंत्री अनिल विज यांनी टीका करताना मोहिमेला पाठिंबा देणार्‍या सर्वांना पाकिस्तानचे समर्थक असल्याचे म्हटले आहे. गुरमेहरचे समर्थन करणार्‍यांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे, असेही विज यांनी म्हटले आहे.

दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या गुरमेहर कौरने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधी मोहिमेला पाठिंबा दिला आहे. कारगिल युद्धात वडिल गमावणार्‍या गुरमेहरने मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला घाबरत नाही, असे सोशल मीडियावर म्हटले होते. यानंतर गुरमेहरला बलात्काराच्या आणि ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. दिल्ली पोलिस आणि दिल्लीच्या महिला आयोगाकडे याबाबत गुरमेहरने तक्रार केली आहे.

वडिलांच्या मृत्यूसाठी कारगिल युद्धाला जबाबदार धरणार्‍या गुरमेहरला पाठिंबा देणार्‍यांना देशाबाहेर काढायला हवे, असे ट्विट अनिल विज यांनी बुधवारी केले. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या बाजून उभे राहणार्‍या गुरमेहरवर मंगळवारी कुस्तीपटू बबिता फोगट आणि योगेश्वर दत्त यांनीही टीका केली होती. आपले वडिल पाकिस्तानमुळे नव्हे, तर युद्धामुळे मारले गेले, हे गुरमेहरचे विधान पटत नाही. गुरमेहरचा हा विचार देशाच्या आणि हुतात्म्यांच्या विरोधातील आहे,’ असे बबिता फोगटने म्हटले होते. विरेंद्र सेहवागने मात्र यापुर्वीच्या तिरकस ट्विटवरून घुमजाव करत बुधवारी गुरमेहरची बाजू घेत, सर्वांना व्यक्त होण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे, असे म्हटले आहे.