गुटखा तस्करी : दोघा आरोपींना 30 पर्यंत पोलीस कोठडी

सोनगीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केली होती कारवाई

धुळे : सोनगीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे 11 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करीत दोघा आरोपींना मंगळवारी अटक केली होती. संशयीतांना बुधवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, सोमवारी रात्रीदेखील सोनगीर पोलिसांनी 28 लाखांचा गुटखा पकडत दोघा आरोपींना अटक केली होती. गुटखा तस्करांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे सुज्ञ जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

गोपनीय माहितीवरून पकडला 11 लाखांचा गुटखा
सोनगीर पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक प्रकाश पाटील यांना शिरपूरकडून धुळ्याकडे गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने नाकाबंदी लावण्यात आली. मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आयशर ट्रक (एम.पी. 13 जीए 8739) आल्यानंतर तिची झडती घेतली असता त्यात हातगाडीची चाके, सोयाबीन आटा, मेडिसीन साहित्य आढळले तर या साहित्याच्या आड राज्यात प्रतिबंधीत सात लाख 56 हजार रुपये किंमतीचा रजनीगंधा गुटखा व तीन लाख 24 हजार रुपये किंमतीचा रजनीगंधा सुगंधीत पानमसाला आढळल्याने तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. गुटख्यासह नऊ लाख रुपये किंंमतीचा आयशर ट्रक मिळून 19 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुटख्याच्या वाहतूक प्रकरणी आयशर चालक शरीफ शेख पप्पू खान (58, गंगल्या खेडी, महु, जि.इंदौर) व इस्तेयाक खान उर्फ विक्की अहमद खान (20, खजराणा, नारसानगर, इंदौर) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, जप्त माल हा लोहा मंडी, सरकार ट्रान्सपोर्टचा मालक हेमंत शिवानी (इंदौर, मध्यप्रदेश) यांचा मालकिचा असल्याची कबुली चालकाने दिली आहे. हा माल पुण्यासह भिवंडीत नेला जात असल्याचेही चालकाने पोलिसांना चौकशीत सांगितले. दरम्यान, अटकेतील दोघा आरोपींना बुधवारी न्यायालयाने 30 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या अधिकार्‍याच्या पथकाने पकडला गुटखा
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे, शामराव अहिरे, सदेसिंग चव्हाण, संजय जाधव, शिरीष भदाणे, विशाल सोनवणे, अतुल निकम आदींच्या पथकाने गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळल्या.

Copy