गुजरात राज्यातील वापीहून शेकडो मुली घरी परतल्या

0

नवापूर:आदिवासी विकास विभागाच्या अधिकार्‍यांशी आ.शिरीषकुमार नाईक यांनी संपर्क साधून नंदुरबार जिल्हा प्रशासन, आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी आणि आ.नाईक यांच्या मध्यस्थीने गुजरात राज्यातील वापी येथील वेलसन कंपनीत काम करणार्‍या शेकडो आदिवासी मुलींना स्वगावी खासगी लक्झरीने आणले आहे. शुक्रवारी, 8 रोजी पहाटेेच्या सुमारास पहिली बस आली. उर्वरित बसेस सायंकाळपर्यत येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. आलेल्या मुलींसह पालकांनी आ.शिरीषकुमार नाईक, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, नंदुरबार जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.

तालुक्यातील हजारोंच्या संख्येने बाहेरील राज्यासह महानगरात अडकलेले कामगार, मजूर, विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमुळे खाण्यापिण्याचे वांदे झाले आहे. त्यांच्याकडील पैसाही संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांना तिथून घरी येण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे नवापूर शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पहाटेच्या सुमारास पहिली बस दाखल झाली होती. बसमधील सर्व मुलींच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारून वैद्यकीय अधिकार्‍यांनी चौदा दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला. मुलींच्या पालकांनी सकाळी कॉलेजला येऊन मुलींना आपल्या घरी नेले.

चौदा दिवस घरातच राहण्याचा सल्ला
सर्व मुलींना चौदा दिवस बाहेर न निघता घरातच राहण्याचा आ.शिरीषकुमार नाईक यांनी सल्ला दिला. कोणीही बाहेरगावी असल्यास त्यांनाही आणण्याचे नियोजन आदिवासी विभाग, नंदुरबार जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासनाने केले आहे. त्यांनाही लवकर आणण्यात येईल, असे आ.नाईक यांनी सांगितले.

Copy