गुजरातमध्ये होणार कॅशलेस सामूहिक विवाह सोहळा

0

अहमदाबाद । गुजरातमधील अरावली जिल्ह्यातील बयाद शहरात कॅशलेस सामूहिक विवाह सोहळा येत्या रविवारी पार पडणार आहे. यावेळी नऊ जोडपी विवाह बंधनात अडकणार आहेत. विवाह सोहळ्याला येणार्‍या मंडळींना अहेर देण्यासाठी स्वाईप मशीन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जोडप्यांना देण्यात येणार्‍या भेटवस्तू, खानपान व्यवस्थापकाला देण्यात येणारे कंत्राट, मंडप व्यवस्थापकाला यांना त्यांची देयके धनादेशामार्फत देण्यात आली, अशी माहिती श्री वीरमाया वंकर समाज सुधारक समितीचे संयोजक हसमुख सक्सेना यांनी दिली. इतकेच नव्हे तर भटजींनाही त्यांची दक्षिणा धनादेशाच्या माध्यमातून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

दपू नामक पारंपरिक विधी पार पाडण्याचे मोठे आव्हान होते. मात्र त्यात देण्यात येणार्‍या भेटीदेखील रोखविहीन पद्धतीने देण्यात येणार आहेत. या विधीची रक्कम ही 600 ते दीड हजारपर्यंत निश्चित करण्यात आली आणि विविध गावातील सूनांना धनादेशाच्या माध्यमातून देण्यात आली. निश्चलनीकरणाच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रोत्साहन म्हणून या पद्धतीने सोहळा पार पाडण्याची विनंती संबंधित जोडप्यांच्या कुटुंबियांना करण्यात आली. या विनंतीला मान देत त्यांनीही आधुनिक पद्धतीने विवाह सोहळा पार पाडण्यास तयार झाल्याचे सक्सेना यांनी सांगितले. आर्थिक पारदर्शकतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य निर्णय घेतला असून तो तितकाच महत्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.