गुजरातमधून 130 मजूर नंदुरबारात: प्रशासनाची धांदल

0

नंदुरबार: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यासह जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक बंद आहे. मात्र असे असताना नंदुरबार तालुक्यातील काकरदे गावात आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुजरात राज्यातून मजुरांच्या 3 ट्रका भरून आल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. गुजरात मधून आलेल्या 131 मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यबंदी असतांना मजुरांनी भरलेल्या या तीन ट्रकांनी नंदुरबार तालुक्यात प्रवेश केलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी याची गंभीरपणे दखल घेऊन पोलिस प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांनी काकरदे गावात भेट देऊन चौकशी केली. यातील 38 मजूर शहादा तालुक्यातील ससदे येथील आहेत तर काही मजूर बोराळे, हाटमोहिदे, येथील आहेत. या सर्व मजुरांची आरोग्य विभागाच्या पथकाने विचारपूस करून होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान कोरोनापासून वाचविण्यासाठी ग्रामसुरक्षा दलातील कार्यकर्ते व पोलिस पाटील, सरपंच हे खबरदारी घेत आहेत.

Copy