गुजरातचे जवान का शहीद होत नाहीत?

0

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देशासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण भारतासह संपूर्ण भारतातील जवान शहीद झाले. पण आतापर्यंत गुजरातमधील एखादा जवान शहीद झाला आहे काय, असा सवाल उपस्थित करत गुजरातमधील शहीद झालेल्या जवानांची मला माहिती द्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे. अखिलेश यांच्या या विधानामुळे नवा वाद ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अखिलेश यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच ही टीका केल्याचे बोलले जात आहे.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अशांतता आहे. दहशतवादी आणि जवानांशी चकमकीबरोबरच पाकिस्तानकडूनही वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहेत. यामध्ये भारताचे जवान हुतात्मा झाले आहेत. नेमके अशाच प्रसंगी अखिलेश यांनी हे विधान केले आहे. यावरून देशासाठी शहीद झालेल्या जवानांवरून राजकारण केले जात असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर आघाडी केली होती. दोन्ही पक्षांना एकत्रित 60 जागाही मिळवता आल्या नव्हत्या. निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षात उभी फूट पडली होती. एका बाजूला अखिलेश तर दुसरीकडे मुलायमसिंह यादव आणि शिवपाल यादव असा गट पडला होता.