गुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले

0

नवी दिल्ली: ऑनलाइन व्यवहारांसाठी पेटीएम हे अॅप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र पेटीमने नियमांचे उल्लंघन केले आहे. पेटीमने पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी दिल्याने त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुगलने पेटीमला प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही असे स्पष्टीकरण गुगलने दिले आहे. गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई केली आहे. त्यामुळे आता हे अ‍ॅप आता फक्त अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल.

लाखो युझर्स असणाऱ्या पेटीएमवर कारवाई करण्यात आल्याने हा पेटीमसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ‘ज्या गोष्टींमुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते अशा गोष्टींपासून आमच्या युझर्सचे संरक्षण व्हावे असे आमचे नियम आहेत. आम्ही ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अ‍ॅपला परवानगी देत नाही. एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अ‍ॅपचाही यामध्ये समावेश होतो. अशाप्रकारच्या देवाणघेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे,’ असे गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे.

Copy