मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार गोंधळ झाला. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये आ. गिरीश महाजन यांचाही समावेश आहे. एक वर्षासाठी ही कारवाई आहे.
दरम्यान, शिवीगाळ भाजपाच्या नव्हे, तर शिवसेनेच्या आमदारांनी केली असल्याचा दावा भाजपाचे आ. आशिष शेलार यांनी केला.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित एक ठराव मांडला. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्यासंबंधी हा ठराव होता. त्यास भाजपच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. त्यावेळी काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. तालिका अध्यक्षासमोरचा माइक व राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सभागृह तहकूब झाल्यानंतरही हे सदस्य शांत झाले न. त्यांनी अध्यक्षांच्या दालनातही गोंधळ घातला. अध्यक्षांना शिवीगाळ केली. स्वत: तालिका अध्यक्षांनी ही माहिती देत तीव्र नाराजी व्यक्त केली.
निलंबन झालेल्या आमदारांची नावे
डॉ. संजय कुटे, जळगाव जामोद
आशिष शेलार, वांद्रे पश्चिम
अभिमन्यू पवार, औसा, लातूर
गिरीश महाजन, जामनेर, जळगाव
अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई
पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई
हरिश पिंपळे, मूर्तिजापूर, अकोला
राम सातपुते, माळशिरस, सोलापूर
जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे
योगेश सागर, चारकोप, मुंबई
नारायण कुचे, बदनापूर, जालना
कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर