गिरणा नदी पात्रात वाळू माफियांसाठी “लॉक डाऊन” सुरू करावा

पर्यावरण प्रेमी नागरिकांची मागणी

एरंडोल:-सध्या सर्वत्र कोरोना चा उद्रेक सुरू असताना तालुक्यातील हनुमंत खेडे सिम, वैजनाथ, नागझिरी शिवार, कढोली शिवार या ठिकाणी गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा व वाहतूक होत आहे. कोरोना रोखण्यासाठी लॉक डाऊन , जनता कर्फ्यू, त्यांच्यासह इतर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र कोरोनाच्या महामारी च्या काळात सुद्धा गिरणा नदी पात्रात सुरु असलेला वाळू माफियांचा हैदोस थांबविणे हे प्रशासकीय यंत्रणाच या आवाक्याबाहेर आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. कोरोना चे निमित्त साधून आतातरी वाळू चोरी रोखण्यासाठी वाळू माफियांवर “कर्फ्यू “लागू करण्यात यावा, किंवा त्यांच्यासाठी लॉक डाऊन सुरू करावा अशी जनमानसातून चर्चा होत आहे. विशेष हे की वाळू माफियांच्या दहशतीला घाबरून जाणकार सुद्धा तक्रारी करून सुद्धा काही एक उपयोग होत नाही. म्हणून आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत. अशी माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी दिली आहे.
एरंडोल तालुक्यात गिरणा नदी पात्र ही वाळू माफिया साठी “सोन्याची खान” ठरू लागली आहे. त्यामुळे रोज संध्याकाळी सहा वाजेपासून ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत चोरटी वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. एका ट्रॅक्टरला एका रात्रीतून पंधरा ते वीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे वाळू चोरीच्या धंद्यात काही गावातील सरपंच , व ग्रामपंचायत सदस्य सुद्धा सामील झालेले आहेत.

तक्रारींना केराची टोपली
आतापर्यंत अनेक सुजाण नागरिकांनी वाळू चोरी संदर्भात तहसीलदार,प्रांताधिकारी जिल्हाधिकारी ,जिल्हा गौण खनिज अधिकारी राज्यपाल मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत परंतु एकाही तक्रारीची दखल आजवर घेण्यात आलेली नाही म्हणून तक्रारी करून काहीच उपयोग नाही अशी भावना तक्रारदारांची झाली आहे. वाळू चोरी करणाऱ्यांचे हात दूर वर पोहोचले आहेत. हे त्यावरून स्पष्ट होते. म्हणून अशाप्रकारे वाळू चोरीचा प्रकार असाच यापुढेही सुरू राहिला तर गिरणा नदीच्या पात्रात वाळू ऐवजी शेत जमीन तयार झाली नाही तर नवल कसे.

रस्त्यांची दुर्दशा
वाळू चोरी होत असलेल्या भागातील रस्ते उदाहरणार्थ ताडे, बामणे, एरंडोल या रस्त्यांची चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मुळे कमालीची दुर्दशा झाली आहे. वाळू चोरीची वाहने वेगाने ये जा करीत असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात अपघात सुद्धा झाले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्ते तयार करण्याची जबाबदारी वाळू माफियांन वर सोपवावी अशी टिका केली जात आहे. तसेच बेसुमार वाळू उपसा होत असल्याने गिरणा नदीचे पात्र अधिकाअधिक खोल होत आहे. तसेच पर्यावरणाची होणारी हानी कधीही भरून निघू शकत नाही.

शेतीसाठी मजुरांचा वानवा
गिरणा नदी काठावरील बहुतांश गावांमध्ये शेतीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. वाळू चोरी साठी एका दिवसाला हजार रुपये मजुराला मोबदला मिळतो. म्हणून मजुरांनी पाठ फिरवली आहे. म्हणून शेतीकामासाठी मजुरांचा वानवा जाणवत आहे.

वाळू चोरी बेसुमार, व कारवाई जेमतेम
वाळू माफियांना रोखण्यासाठी महसूल यंत्रणेने अनेक पथकांची नियुक्ती करून कागदी घोडे नाचवले आहेत. प्रत्यक्षात वाळू चोरी वर कारवाई केल्याचे प्रमाण फारच कमी दिसून येते त्या तुलनेत वाळू उपसा कित्येक पटीने जास्त असून त्या बेसुमार वाळू उपशाला रोखणे आवश्यक आहे. वाळू चोरी करणार यांची मुजोरी का वाढली आहे? त्यांच्यावर कोणाची कृपादृष्टी आहे?, वाळू चोरी च्या धंद्यात कोण कोण गुंतलेले आहे. याबाबत नागरिकांमध्ये चर्चेला ऊत आले आहे.