Private Advt

गिरडगाव शेत शिवारात चोरट्यांकडून विद्युत वाहिनीच्या तारांची चोरी

यावल : तालुक्यातील गिरडगाव शेत शिवारातुन अज्ञात चोरट्यांकडून विद्युत वाहिनीची तारांची चोरीचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. यात अज्ञात चोरट्यांनी तार चोरी करीत जागेवरच त्यांचे तुकडे केले व त्यांचे बांधलेले गठ्ठे मिळून आले यात सदरील चोरी विद्युत तार हे भंगारात विक्रीच्या उद्देशाने चोरी केल्याचे निर्दशनास आले असुन चोरी करतांना एक विद्युत खांब कोसळून अपघात झाला असावा व मुद्देमाल सोडून चोरटे पसार झाले असावे, असा अंदाज लावला जात आहे. याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
राज्य विद्युत वितरण कंम्पनीचे सहाय्यक अभियंता पंकज कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार शनीवारी सकाळी गिरडगाव शिवारातुन विद्युत तार चोरीस गेल्याची माहिती पोलिस पाटील अशोक पाटील यांनी दिली होती तेव्हा पडताळणी करीता ते गिरडगाव ता. यावल शेत शिवारात नारायण बोरसे यांच्या शेतात गेले असता तेथील रोहित्र क्र.04 जवळील 21 खांबावरील लघुदाबाच्या तीन फेज व एक न्युट्री असा विद्युत वाहिनीच्या तार अज्ञात चोरट्यांनी कापून त्याचे गठ्ठे बांधलेल्या अवस्थेत निर्दशनास आले.

71 हजार रुपये किंमतीचे तार
यात सुमारे 71 हजार रूपये किंमतीचे हे तार असुन चोरांनी कटरने कट करुन दोन फुटाचे तुकडे करून त्याचे गठ्ठे बांधुन चोरी करण्याचा त्याचा उद्देश होता. दरम्यान खांब्यावरील तार कट करतांना एका खांब कोसळलेला दिसत आहे तर चोरी दरम्यान अपघात घडल्याने सर्व चोरी करून गठ्ठे बांधलेले तार आणी कटर जागेवर सोडून चोरटे पसार झालेले दिसत आहे. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजीज शेख करीत आहे.

अपघाताची शक्यता, भंगारात तार विक्रीचा उद्देश
घटनास्थळी दोन तार कटर मिळुन आले आहेत तसेच तारांचे आठ गठ्ठे जागेवरचं मिळून आले आहे. अज्ञात चोरट्यांनी विद्युत तार हे भंगारमध्ये विक्रीच्या उद्देशाने चोरी करत असल्याचे दिसून येत आहे तसेच चोरी करतांना एक खांब कोसळलेला असुन यात चोरटा जखमी झाला असावा म्हणुन त्यांनी साहित्य सोडून पळ काढला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.