गावठी पिस्टलासह चौघे पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

पाचोरा पोलिसांची सतर्कता ः बेकायदेशीररीत्या पिस्टल बाळगणार्‍यांची टोळी जाळ्यात

पाचोरा : पाचोरा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बेकायदेशीरीत्या पिस्टल बाळगणार्‍या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून पिस्टलसह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. भडगाव रोडवरील समर्थ व्हॅलीजवळ ही गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
गुरुवार, 23 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काही जण एका चारचाकीतून अग्निशस्त्र घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी मिळाली. त्यांनी या ही माहिती आपल्या वरीष्ठ अधिकार्‍यांना कळविल्यानंतर पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौबे, ए.एस.आय.सुनिल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील, प्रवीण परदेशी, समीर पाटील (चालक) या पथकाने मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास भडगाव रोडवरील समर्थ व्हॅलीजवळ सापळा रचला. इंडिका (एम.एच.19 ए.एक्स. 9819) अडवून तिची झडती घेतली असता त्यात गावठी पिस्टल व मॅग्झीन आढळले. पोलिसांनी या प्रकरणी भैय्या निकुंभे (25), रोहित साहेबराव झोगडे (22, नाशिक), नितीन बाबुलाल नासरे (27, अकोला), सचिन पाटील (31, पाचोरा) यांना अटक केली तर अडीच लाख रुपये किंमतीची चारचाकी जप्त करण्यात आली.

अनर्थ टळला : सतर्कतेचे कौतुक
संशयीतांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे. पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या सतर्कतेने पुढील होणारा अनर्थ टळला असून त्यांच्यासह पोलीस पथकाने दाखविलेल्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.